Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

#IndiaReady4Olympics । ‘इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक’चा पिंपरी-चिंचवडमधून ऐतिहासिक नारा!

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांची मोठी घोषणा

इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमध्ये ५६ हजारांहून अधिक सायकलपटूंचा सहभाग

१०० वा ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रम २०३६ च्या ऑलिम्पिक तयारीला समर्पित

पिंपरी-चिंचवड, पुणे | प्रतिनिधी

रविवारची सकाळ. हिंदूभूषण स्मारक मैदानावर नजर जाईल तिथवर सायकली आणि सायकलपटूंची गर्दी. तरुणांच्या चेहऱ्यावर जोश, तर सायकलफेरी कधी सुरू होणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता. मान्यवरांच्या मांदियाळीत केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय स्वतः सायकलवर स्वार झाले आणि त्यांनीही पाच किलोमीटरची फेरी पूर्ण केली. ५६ हजारांहून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने रंगलेल्या इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमधून ‘इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक’चा (#IndiaReady4Olympics) नारा घुमला. हा उत्साह पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फिट इंडिया’चे स्वप्न साकार होताना दिसत असल्याची भावना मांडवीय यांनी व्यक्त केली. ‘संडेज ऑन सायकल’चा १०० वा उपक्रम २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीला समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पिंपरी-चिंचवड पोलीस, अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, डब्ल्यूटीई इन्फ्रा, आयआयबी आणि विविध पर्यावरणप्रेमी संस्था व संघटनांच्या पुढाकारातून या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले.

‘इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक’चा नारा देत मोशी येथील हिंदूभूषण स्मारक मैदानावर रविवारी (२९ नोव्हेंबर) झालेल्या इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमध्ये ५६ हजारांहून अधिक सायकलपटू सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीतून सायकलिंगचा संकल्प देशभर पोहोचेल, असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडला ‘फिट इंडिया’ चळवळीशी जोडल्याबद्दल त्यांनी आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले.

स्वतंत्र भारतामध्ये आतापर्यंत एकदाही ऑलिम्पिंक स्पर्धा झालेली नाही. नवी दिल्लीत १९५१ आणि १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा, तर २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. भारताने २०३६ च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे इच्छापत्र सादर केले आहे. इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक्स’ (#IndiaReady4Olympics) ही ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’च्या १००व्या आवृत्तीची अधिकृत संकल्पना आहे. ऑलिम्पिक चळवळीचा उत्सव साजरा करणे, नागरिकांचा खेळातील सहभाग वाढवणे आणि देशात क्रीडा संस्कृती बळकट करणे हा तिचा उद्देश आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी या देशव्यापी उपक्रमाची घोषणा पिंपरी-चिंचवडमधून करण्यात आली.

हेही वाचा

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा शुभारंभ

यावेळी पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे, महापौर रवि लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषद आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रत्येक सोसायटीला ‘फिटनेस हब’ बनवण्याचा संकल्प

“‘इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक’ या संकल्पासाठी आम्ही सज्ज आहोत. जे. आर. डी. टाटा यांनी या शहराची औद्योगिक पायाभरणी केली. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या नागरिकांचे येथे वास्तव्य असल्याने पिंपरी-चिंचवड हे ‘मिनी इंडिया’ आहे. शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला ‘फिटनेस हब’ बनवायचे आहे. पिंपरी-चिंचवडला जगातील प्रमुख क्रीडा केंद्रांपैकी एक बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. यावेळी ‘ऑलिम्पिक की तैयारी है…’ ही चित्रफीत दाखवण्यात आली.

नशामुक्ती आणि जलसंवर्धनाची प्रतिज्ञा

‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या ब्रँड ॲम्बॅसिडर ऐश्वर्या राज भगोनी यांनी उपस्थितांना नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली. बलजित कौर यांनी राष्ट्रीय जल मिशनअंतर्गत जलसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमात लेखक निलेश रमेश भिसे लिखित ‘वीरांचे भूषण-बुधभूषण शंभू निती काल-आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अवधूत गांधी यांच्या शौर्यगीतांनी आणि भांगडा नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.

“‘इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक’ या संकल्पासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या नागरिकांचे हे ‘मिनी इंडिया’ आहे. “‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’च्या शंभराव्या आवृत्तीचे नेतृत्व केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या पिंपरी-चिंचवडमधून केले, याचा मला अभिमान वाटतो. आपल्या शहराने ‘इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक्स’चा संदेश देशाला दिला. मोशीच्या मैदानावर आज तरुणांचा जो उत्साह पाहिला, तो आपल्या शहराची क्रीडा संस्कृती आणखी बळकट करण्याची प्रेरणा देणारा आहे. या विश्वविक्रमी सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार आहेत.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

“रिव्हर सायक्लोथॉनमध्ये हजारो सायकलपटूंचा उत्साह पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फिट इंडिया’चे स्वप्न साकार होताना दिसत आहे. विकसित भारत घडवण्यासाठी देशवासीयांनी तंदुरुस्त असले पाहिजे. निरोगी समाजच समृद्ध राष्ट्र घडवू शकतो. ‘संडेज ऑन सायकल’चा १०० वा उपक्रम २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीला समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीतून सायकलिंगचा संकल्प देशभर पोहोचेल. ५६ हजाराहून अधिक नागरिकांसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडला ‘फिट इंडिया’ चळवळीशी जोडल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे विशेष आभार.”

– डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय क्रीडामंत्री.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group