Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उजनी धरण परिसरात तीन ठिकाणी आधुनिक मत्स्यबाजार उभारणार

 प्रेमनगर, पंढरपूर आणि पंढरपूर-माळशिरस सीमेवर बाजारपेठ प्रस्तावित; महिनाभरात सविस्तर आराखडे सादर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : उजनी धरणावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रेमनगर, पंढरपूर आणि पंढरपूर-माळशिरस सीमेवरील बंधाऱ्यालगत अशा तीन ठिकाणी आधुनिक मत्स्यबाजार उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत या बाजारांचे सविस्तर प्रस्ताव महिनाभरात सादर करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीला आमदार अभिजित पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, सोलापूरचे जिल्हाधिकारी ऑनलाइन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी समन्वयाने प्रस्ताव तयार करून स्थानिक आमदारांच्या मान्यतेनंतर शासनाकडे पाठवावेत, असे राणे यांनी सांगितले.

उजनी धरणाच्या भिंतीजवळील प्रेमनगर परिसरात सोलापूर-पुणे महामार्गालगत सध्या मासळी विक्री केली जाते. येथे स्वतंत्र बाजार उभारल्यास मच्छीमारांना निश्चित विक्रीस्थळ मिळेल. पंढरपूरमध्ये चंद्रभागा मत्स्यमारी संस्थेच्या मर्यादित जागेत सुमारे २०० ते २२५ मच्छीमारांना गटागटाने व्यवसाय करावा लागतो. तर पंढरपूर-माळशिरस सीमेवरील बंधाऱ्यालगतही मोठ्या संख्येने मच्छीमार कुटुंबे व्यवसाय करतात.

हेही वाचा –  मुंबईतील मैदाने, उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात जाणार नाहीत; महापालिकाच करणार विकास

या तिन्ही ठिकाणच्या गरजांनुसार स्वतंत्र आराखडे तयार करून जागांची पाहणी करावी. जागा ग्रामपंचायत, मत्स्य संस्था किंवा अन्य विभागाच्या मालकीची असल्यास आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे घ्यावीत, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.

ग्रामपंचायत क्षेत्रातील मत्स्यबाजारासाठी सुमारे तीन कोटी रुपये, तर नगरपालिका क्षेत्रातील बाजारासाठी पाच कोटी रुपयांची प्राथमिक गरज असल्याचे आमदारांनी बैठकीत सांगितले. निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह अन्य पर्याय तपासण्याची सूचना राणे यांनी केली.

उजनी धरणातील गोड्या पाण्यात टिकणाऱ्या नव्या मत्स्यप्रजातींचे संवर्धन आणि मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी स्वतंत्र संकल्पना तयार करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. प्रस्तावांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group