Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीगच्या निवड चाचणीला दमदार प्रतिसाद!

दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील ९०० हून अधिक कबड्डीपटूंचा सहभाग

– ‘निवड चाचणीच इतकी भव्य, तर मुख्य स्पर्धा किती शानदार असेल!’ खेळाडूंमध्ये उत्सुकता

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

‘धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीग’ची दोन दिवसीय निवड चाचणी पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात पार पडली. लीगमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ९०० हून अधिक कबड्डीपटू दोन दिवसांत मैदानात उतरले. पहिल्या दिवसापासूनच चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळाडूंनी चढाई, पकड आणि बचावातील आपले कौशल्य दाखवले. राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या कबड्डीपटूंचा सहभागही लक्षवेधी ठरला.

भाजप नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची आणि व्यावसायिक स्तरावर खेळण्याची संधी मिळावी, तसेच महाराष्ट्राची कबड्डी परंपरा पुढे जावी, हा लीगचा उद्देश आहे.

प्रो-कबड्डीसारख्या व्यावसायिक स्पर्धांच्या धर्तीवर निवड चाचणीचे नियोजन करण्यात आले होते. चाचणीसाठी दोन मैदाने सज्ज करण्यात आली होती. खेळाडूंसाठी आवश्यक सोयी-सुविधा, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, मैदानांवरील प्रकाशयोजना आणि चाचणीची प्रसिद्धी यांचे नियोजन करण्यात आले होते. ‘निवड चाचणीच इतकी भव्य झाली, तर मुख्य स्पर्धा किती शानदार असेल!’ अशा प्रतिक्रिया सहभागी कबड्डीपटूंनी व्यक्त केल्या. आता लीगच्या मुख्य स्पर्धेकडे खेळाडूंसह कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –  नार्वेकरांवरील आरोपांची तक्रार आल्यास चौकशी करू : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा गौरव

निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी आमदार महेश लांडगे यांच्या वतीने कबड्डीतील दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचा गौरव करण्यात आला. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, अशोक शिंदे आणि राजू घुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते शोभा शिंदे भगत, शीतल मारणे, सुमती पुजारी, पूजा शेलार, माणिक भोगाडे आणि विराज लांडगे यांचाही गौरव करण्यात आला. आशियाई सुवर्णपदक विजेते अस्लम इमानदार यांच्यासह आदित्य शिंदे, शुभम शिंदे, पंकज मोहिते, अजित पवार आणि शिवम पठारे यांच्या कामगिरीचीही दखल घेण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंच्या वाटचालीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या सन्मानामागील उद्देश होता. या सोहळ्यास राजेंद्र आंदेकर, संदीप पायगुडे, डॉ. मिलिंद जाधव, राष्ट्रीय खेळाडू निलेश नाना लोखंडे, आदिनाथ गवळी, सुनील लांडे, राजेश ढमढेरे, दीपक धावडे, दत्ता माने, सागर गोळे, तुषार नागरगोजे, प्रकाश पवार आणि मच्छिंद्र लांडगे यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक आणि कबड्डीप्रेमी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला, जिद्द, शिस्त आणि संघभावना शिकवणारा आपला अभिमानाचा खेळ आहे. आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांचा सन्मान करणे, ही आपली कृतज्ञता आहे. धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्थानिक आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रतिभेला योग्य संधी मिळावी आणि नव्या पिढीने कबड्डीतून मोठी स्वप्ने पाहावीत, हा आमचा संकल्प आहे. खेळाडूंच्या घामाला सन्मान आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group