आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप
‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ उपक्रम

नगरसेविका नम्रता लोंढे व योगेश लोंढे यांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावात गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या २०० मदत किटचे वाटप करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत नगरसेविका सौ. नम्रता लोंढे आणि योगेश लोंढे यांनी या वाटपासाठी पुढाकार घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवाकार्याच्या प्रेरणेतून आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक सहकारी, एक गाव, प्रत्येक कुटुंबाला आधार’ या संकल्पनेतून ५१ आदिवासी गावांतील गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. दैनंदिन गरजा भागवताना अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हेही वाचा
जत्रेतील दूषित चाऊमीनमुळे १३० जणांना अन्नविषबाधा! ११८ मुले आणि १२ प्रौढ आजारी

आहुपे येथील वाटपासाठी जालिंदर कातकडे, कौशल पब्बुन आणि विजय बिरादार यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. आहुपेचे सरपंच रमेश लोहकरे यांनी गावातील गरजू कुटुंबांना मदत दिल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले.
“आहुपेतील गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत वेळेवर मिळावी, या हेतूने आम्ही २०० किटचे वाटप केले. आमदार महेशदादा लांडगे यांच्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमात आम्हाला खारीचा वाटा उचलता आला, याचे समाधान आहे. गावातील कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे ही मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवता आली.”
– नम्रता लोंढे, नगरसेविका, भाजपा.




