Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भारतीय सण-उत्सव राष्ट्रीय एकात्मता दृढ करतात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुहू चौपाटीवरील छठपूजा महोत्सवात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; छठव्रती महिलांसाठी कायमस्वरूपी सुविधांची व्यवस्था

मुंबई : भारतीय सण आणि उत्सव हे आपल्या प्राचीन व सनातन संस्कृतीचे प्रतीक आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे उत्सव करतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा महोत्सवात सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना छठपर्वाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, छठपूजेचे आयोजक मोहन मिश्रा, दिवाकर मिश्रा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

छठपूजेच्या निमित्ताने भक्तीचा महासागर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छठपूजेच्या निमित्ताने जुहू चौपाटीवर पाण्याचा अथांग सागर आणि भक्तांचा महासागर असे दोन सागर एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी आणि छठी मैयाचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक श्रद्धेने एकत्र आले आहेत.

सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असून त्याच्या प्रकाशामुळेच सृष्टीतील जीवसृष्टी आणि वनस्पतींचे जीवन शक्य होते. मानवी जीवन, शेती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा छठपर्व हा महत्त्वाचा उत्सव आहे. या पूजेमध्ये मावळत्या आणि उगवत्या अशा दोन्ही सूर्यांना अर्घ्य अर्पण केले जाते.

सूर्यनारायण, जल आणि छठी मैया कोणताही भेदभाव करत नाहीत. जात, धर्म, भाषा, प्रांत किंवा आर्थिक परिस्थिती यांचा विचार न करता श्रद्धेने अर्घ्य अर्पण करणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद मिळतो. हीच या पर्वाची व्यापक शिकवण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा –  मुंबईत ‘बाल अधिकार सप्ताहा’ला सुरुवात; बालकांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती

छठव्रती महिलांसाठी कायमस्वरूपी सुविधांची व्यवस्था

छठपूजेच्या आयोजनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१४ पासून छठव्रती माता-भगिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निर्जला व्रत करणाऱ्या महिला रात्रीच्या वेळीही पूजेसाठी चौपाटीवर उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची आणि आवश्यक सुविधांची काळजी घेणारी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात आली आहे.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न : अमित साटम

यावेळी आमदार अमित साटम यांनी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबईतील नदी-नाल्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय हरित लवादाकडे पाठपुरावा करून सांडपाणी विसर्गासाठी आवश्यक निकष निश्चित करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत सध्या सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू आहेत. या केंद्रांमुळे प्रक्रिया केलेले सांडपाणीच समुद्रात सोडण्यास मदत होणार आहे. जुहू चौपाटीसह मुंबईच्या विविध समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group