मुंबईत ‘बाल अधिकार सप्ताहा’ला सुरुवात; बालकांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती
सीएसएमटी, दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवर बालदिन साजरा; चाइल्ड हेल्पलाईन १०९८ आणि आपत्कालीन मदत क्रमांक ११२ बाबत माहिती

मुंबई : बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षितता याबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यभरात १४ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘बाल अधिकार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्क संहिता स्वीकारली होती. या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ बालकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन (जिल्हा व रेल्वे), मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख रेल्वे स्थानकांवर बाल अधिकार सप्ताहाचे उद्घाटन आणि बालदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांत रेल्वे स्थानक परिसरात आढळणाऱ्या तसेच प्रवासादरम्यान उपस्थित असलेल्या बालकांचे गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. बालकांच्या हस्ते केक कापून बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी बालके, त्यांचे पालक आणि रेल्वे प्रवाशांना बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या शासकीय यंत्रणांची माहिती देण्यात आली.
संकटात किंवा असुरक्षित परिस्थितीत सापडलेल्या बालकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी २४ तास कार्यरत असलेल्या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ आणि आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक ११२ याबाबत विशेष जनजागृती करण्यात आली.
हेही वाचा – आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; नितेश राणे यांची ग्वाही
सप्ताहभर विविध जनजागृती उपक्रम
१४ ते २० नोव्हेंबर या सप्ताहादरम्यान मुंबई शहर जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानके, पोलीस ठाणी, शाळा, रुग्णालये आणि वस्तीस्तरावर जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये स्वाक्षरी मोहीम, जनजागृती रॅली, सेल्फी फ्रेम, पथनाट्य, फ्लॅशमॉब आणि माहितीपत्रकांचे वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन (जिल्हा व रेल्वे) पथकाचे सदस्य उपस्थित होते. तसेच संबंधित रेल्वे स्थानकांचे स्टेशन मॅनेजर, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि ‘रेल्वे चिल्ड्रन्स इंडिया’, ‘मुंबई स्माईल्स’ व ‘हमारा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते.
अधिक माहितीसाठी संपर्क
बाल अधिकार सप्ताह आणि बाल संरक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी चाइल्ड हेल्पलाईन, मुंबई शहरचे प्रकल्प समन्वयक नितीन अशोक दीक्षित यांच्याशी ९८६७१७५८७२ या मोबाईल क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




