रोज १० हजार पावले चालणे गरजेचे आहे का? वयानुसार किती चालावे, जाणून घ्या योग्य प्रमाण
१० हजार पावलांचे लक्ष्य पूर्ण झाले नाही तरी आरोग्याला मिळू शकतात फायदे; WHO च्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमित शारीरिक हालचाल अधिक महत्त्वाची

मुंबई : आजकाल तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक जण सकाळपासूनच स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉचच्या मदतीने पावले मोजतात. दिवस संपण्यापूर्वी १० हजार पावलांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, दररोज १० हजार पावले चालली नाहीत तर आरोग्याला फायदा मिळत नाही, असे अजिबात नाही. वय, शारीरिक क्षमता आणि आरोग्याच्या स्थितीनुसार कमी पावले चालूनही आरोग्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने एकाच आकड्याचा ताण घेण्याऐवजी आपल्या क्षमतेनुसार नियमित सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे.
WHO च्या व्यायामविषयक मार्गदर्शक सूचना काय सांगतात?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वेगवेगळ्या वयोगटांसाठी दररोज किती पावले चालावीत, याची ठराविक संख्या निश्चित केलेली नाही. त्याऐवजी वयानुसार शारीरिक हालचाली आणि व्यायामासाठी कालावधी निश्चित केला आहे.
- ५ ते १७ वर्षे : मुले आणि किशोरवयीन मुलांनी दररोज किमान ६० मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या शारीरिक हालचाली कराव्यात. यामध्ये खेळ, धावणे, सायकल चालवणे यांचा समावेश होतो.
- १८ ते ६४ वर्षे : प्रौढांनी आठवड्याला १५० ते ३०० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा त्याच्या समतुल्य तीव्र शारीरिक हालचाल करावी.
- ६५ वर्षांवरील व्यक्ती : चालण्यासोबत स्नायू मजबूत करणारे आणि शरीराचा समतोल राखण्यास मदत करणारे व्यायाम करावेत.
हेही वाचा – राष्ट्रपतींच्या अंगरक्षकावर गोळीबार, फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून घडली घटना
वयानुसार किती पावले चालणे योग्य?
वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये वयानुसार चालण्याचे प्रमाण आणि आरोग्याचे फायदे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, पावलांची संख्या ही प्रत्येकासाठी बंधनकारक मर्यादा नसून ती व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार बदलू शकते.
- ५ ते १७ वर्षे : या वयोगटात मैदानी खेळ, धावणे आणि सायकल चालवण्यासारख्या हालचालींना प्राधान्य द्यावे. दररोज ६० मिनिटांच्या शारीरिक हालचालींचे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे.
- १८ ते ३९ वर्षे : नियमित चालणे आणि इतर व्यायामाच्या माध्यमातून सक्रिय राहावे. काही संशोधनांमध्ये दररोज सुमारे ७ हजार पावले चालण्याचेही आरोग्यदायी फायदे दिसून आले आहेत.
- ४० ते ५९ वर्षे : स्वतःच्या क्षमतेनुसार चालण्याचे प्रमाण ठरवावे. अचानक पावलांची संख्या वाढवण्याऐवजी हळूहळू वाढ करावी.
- ६० ते ६९ वर्षे : नियमित चालण्यासोबत स्नायूंची ताकद आणि शरीराचा समतोल राखणाऱ्या व्यायामांचा समावेश करावा.
- ७० वर्षांवरील व्यक्ती : पावलांच्या ठराविक आकड्याचा ताण न घेता स्वतःच्या क्षमतेनुसार चालावे. कमी पावले चालूनही आरोग्याला फायदा होऊ शकतो.
१० हजार पावलांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा ताण घ्यावा का?
दररोज सहजपणे १० हजार पावले चालता येत असतील, तर ते चांगले आहे. मात्र, हे लक्ष्य पूर्ण झाले नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही. ‘JAMA Network Open’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, आठवड्यातील काही दिवस ८ हजार किंवा त्याहून अधिक पावले चालणाऱ्या प्रौढांमध्ये गंभीर आरोग्यसमस्या आणि मृत्यूचा धोका कमी असल्याचे आढळले आहे.
त्यामुळे केवळ १० हजार पावलांचा आकडा गाठण्यापेक्षा नियमित चालणे, दिवसभर सक्रिय राहणे आणि आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी चालण्याचे प्रमाण ठरवताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.




