TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

५०० रुपयांची नोटही होणार बंद? चंद्राबाबू नायडूंची मोठी मागणी; डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यावर भर!

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोठ्या नोटा चलनातून हटवण्याची मागणी; फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटा ठेवण्याचे मत

अमरावती : देशातील डिजिटल पेमेंट व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठ्या मूल्यांच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा बंद करून बाजारात फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात ठेवाव्यात, असे मत त्यांनी मांडले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि आर्थिक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

डिजिटल पेमेंट आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडताना नायडू यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ही मागणी मांडली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मोठ्या नोटा बंद करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. रोख व्यवहारांवर मर्यादा आणल्यास भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या व्यवहारांना आळा घालण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.

‘फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटा असाव्यात’

चंद्राबाबू नायडू यांनी ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनातून हटवण्याची मागणी केली. बाजारात केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटा असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल चलन आणि ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन दिल्यास आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढू शकते, असेही त्यांचे मत आहे.

विशेष म्हणजे, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटाबंदीला दहा वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर नायडू यांच्या विधानाची चर्चा होत आहे.

हेही वाचा –  गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील विराजमान; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मी कायदा आणि संस्थेच्या बाजूने’!

तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल

व्यवस्थेतील त्रुटींमुळे भ्रष्टाचाराचे जाळे अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे नायडू यांनी म्हटले. डिजिटल व्यवहारांचा विस्तार झाल्यास आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचाराच्या संधी कमी होतील, असा त्यांचा विश्वास आहे.

तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी केल्यास देशात संपत्ती निर्माण करणे आणि गरिबी कमी करणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले. डिजिटल चलन हे भविष्यातील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे माध्यम ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

निवडणुकांमधील पैशांच्या वापरावरही टीका

चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या पैशांच्या वापरावरही भाष्य केले. निवडणुका पैशाच्या ताकदीवर नव्हे, तर समाजसेवेच्या भावनेतून लढवल्या गेल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. मतदारांना पैसे वाटण्याच्या प्रकारांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

निवडणूक जिंकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या उमेदवारांची सत्तेत आल्यानंतर खर्च केलेला पैसा वसूल करण्याची मानसिकता तयार होते, असा दावा त्यांनी केला. निवडणूक खर्च कमी झाल्यास नेत्यांची जनतेप्रती असलेली जबाबदारी वाढेल आणि राजकारणात सेवाभावाला अधिक महत्त्व मिळेल, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मोठ्या मूल्यांच्या नोटा बंद करण्याच्या नायडू यांच्या मागणीमुळे देशातील चलनव्यवस्था, डिजिटल पेमेंट आणि भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही त्यांची वैयक्तिक मागणी असून केंद्र सरकारकडून असा कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group