२९ सप्टेंबरला मुंबईत ‘निर्धार मोर्चा’; आरक्षण उपवर्गीकरणासाठी निर्णायक लढा
अमित गोरखेंच्या नेतृत्वात मातंग समाजासह वंचित घटकांचा एल्गार; राज्यभरातील ७५ हून अधिक आंदोलनांनंतर मुंबईत शक्तिप्रदर्शन

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी
अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित घटकांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात राज्यभरातील विविध वंचित समाजघटक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, या मागणीसाठी राज्यभरात आतापर्यंत ७५ हून अधिक मोर्चे आणि आंदोलने झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आंदोलनांच्या माध्यमातून शांततापूर्ण मार्गाने शासनाचे लक्ष वेधल्यानंतर आता मुंबईतील आझाद मैदानावर ‘निर्धार मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीला निर्णायक दिशा देण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
‘वंचित घटकांना हक्काचा वाटा मिळणे गरजेचे’
“आरक्षणाचा मूळ उद्देश सर्वांचा सर्वांगीण विकास हा आहे. मात्र, अनुसूचित जातीतील काही विशिष्ट घटकांना अद्याप आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधींपासून कोणताही वंचित घटक दूर राहू नये, यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण होणे गरजेचे आहे,” असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
हेही वाचा
रोजगार महाकुंभातून मिळणार करिअरच्या नव्या संधी : आमदार शंकर जगताप
“राज्यभरात ७५ हून अधिक मोर्चांच्या माध्यमातून आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे. आता २९ सप्टेंबरचा मुंबईतील ‘निर्धार मोर्चा’ हा आमच्या हक्काची, समान संधीची आणि न्यायाची मागणी अधिक तीव्रतेने मांडणारा टप्पा आहे,” असेही गोरखे यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधीची मागणी
अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित घटकांना न्याय्य वाटा मिळावा, ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे. वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी, युवकांना रोजगाराच्या संधी आणि शासकीय भरती प्रक्रियेत न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
राज्यभरातून विविध समाजघटक सहभागी होणार
मातंग, मादिगा, बुरूड, चर्मकार यांसह विविध वंचित समाजघटकांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, महिला आणि युवक या मोर्चात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्याच्या विविध भागांतून मुंबईत येणारे समाजबांधव आझाद मैदानावर एकत्र येऊन आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आपली भूमिका मांडणार आहेत.
राज्यभरातील आंदोलनांनंतर आता मुंबईत होणाऱ्या या ‘निर्धार मोर्चा’च्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा शासनासमोर ठामपणे मांडला जाणार असून, २९ सप्टेंबरच्या आंदोलनाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





