TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे पुनरागमन; २० ते २५ सप्टेंबरदरम्यान जोर वाढण्याची शक्यता

सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अंदाज; परभणी, लातूर, धाराशिव आणि हिंगोलीत पावसाची हजेरी

मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली असतानाच काही जिल्हे अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, २० ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ सप्टेंबरला नाशिकमध्येही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

२१ ते २८ सप्टेंबरदरम्यान बहुतांश भागांत पाऊस

२१ ते २८ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या हंगामातील हा शेवटचा टप्पा असून, या काळातील पाऊस राज्यातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात दिलासा देऊ शकतो. विशेषतः पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागांतील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.

परभणीत जवळपास ४० दिवसांनंतर पाऊस

परभणी जिल्ह्यात जवळपास ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत संततधार पाऊस सुरू झाला. पावसाने दीर्घ खंडानंतर हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला आहे.

पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम झाला असून सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांना पाण्याची गरज होती. आता झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. मात्र पिकांना प्रत्यक्ष किती फायदा होईल, हे पुढील काही तासांतील पावसाच्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा –  दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; शरद पवार यांचे फडणवीस यांना पत्र

धाराशिवमध्ये हलक्या सरी

धाराशिव जिल्ह्यातही दीड महिन्याहून अधिक काळ पावसाची प्रतीक्षा होती. मध्यरात्री जिल्ह्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. पाऊस कमी असला तरी दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लातूरमध्ये दीड महिन्यानंतर पाऊस

लातूर शहर आणि परिसरातही दीड महिन्यांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू झाल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.

जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने शहरातील काही भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

हिंगोलीत खरीप पिकांना दिलासा मिळण्याची आशा

हिंगोली जिल्ह्यातही दीड महिन्याच्या खंडानंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पावसाच्या दीर्घ खंडाचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन पिकावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली होती. आता झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button