गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल
भोसरी, हिंजवडीसह प्रमुख विभागांत वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्ग जाहीर

पिंपरी-चिंचवड | गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विविध मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत. भोसरी, चिखली, तळेगाव, सांगवी, वाकड, निगडी, हिंजवडी आणि पिंपरी वाहतूक विभागांतर्गत प्रमुख रस्त्यांवर वाहनांना प्रवेशबंदी करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही अधिसूचना १२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान, परिस्थितीनुसार विविध ठिकाणी वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. अनेक मार्गांवर दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत, तर काही ठिकाणी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे.
भोसरी विभागात हॅरिस ब्रिज, फुगेवाडी, दापोडी, भोसरी उड्डाणपूल परिसरातील काही मार्गांवर प्रवेशबंदी करण्यात येणार असून वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. चिखली विभागात मोशी, भारतमाता चौक, बोऱ्हाडेवाडी तसेच बो-हाडेवाडी चौक परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
तळेगाव विभागात तळेगाव, इंद्रायणी कॉलेज, चाकण बाजूकडील मार्ग तसेच मावळ परिसरातील काही रस्त्यांवर निर्बंध राहतील. सांगवी विभागात महेश्वरी चौक, माकण, जुनी सांगवी, साई चौक, कृष्णा चौक, शितोळे पेट्रोल पंप आदी परिसरात वाहतूक वळविण्यात येणार आहे.
हेही वाचा
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! हवामान विभागाचा ‘यलो’ अन् ‘ऑरेंज’ अलर्ट
वाकड, निगडी आणि हिंजवडी विभागातही दत्तमंदिर रोड, वाकड, आकुर्डी, दळवीनगर, जांबवडेकर चौक, टाटा जंक्शन, लक्ष्मी चौक आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनचालकांनी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी विभागात पवनानगर, सर्जा हॉटेल, काळेवाडी पूल, डिलक्स चौक, कराची चौक, पिंपरी पूल, साई चौक आदी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी वाढल्यास परिस्थितीनुसार अतिरिक्त निर्बंध लागू करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांनी राखून ठेवले आहेत.
वाहतूक बदलाच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परिस्थितीनुसार प्रवेश देण्यात येईल. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतूक बदल लक्षात घ्या; अन्यथा प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे.




