आळंदी घाटावर ‘वसुली’च्या वादातून दोन तृतीयपंथी गटांत हाणामारी

पुणे : आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठच्या घाटावर ‘वसुली’च्या कारणावरून दोन तृतीयपंथी गट आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांची गर्दी असतानाच झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत एका व्यक्तीला नकल-डस्टरने मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
इंद्रायणी नदीच्या घाटावर ‘वसुली’ कोण करणार, यावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाद वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि मारामारी सुरू झाली. या वेळी एका व्यक्तीवर नकल-डस्टरने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही जणांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – भाजपची कोकणात संघटनात्मक मोर्चेबांधणी; रविंद्र चव्हाणांकडून बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्याचे आवाहन
हाणामारीमुळे घाटावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळाचा फायदा घेत काही भाविकांच्या मंगळसूत्रांसह मोबाईल फोन गायब झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. हाणामारी, धमकी तसेच चोरीच्या आरोपांबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.




