उत्सवांवर निर्बंध नाहीत; अन्नसुरक्षेसाठी FDAचा वर्षभराचा स्थायी आदेश
गणपती, भंडारे, ईद, नाताळ, विवाहसोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना समान नियम; अन्नभेसळ रोखण्यासाठी SOP लागू

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उत्सव आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अन्नभेसळ रोखण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी वर्षभर लागू राहणारे ‘सर्वसमावेशक स्थायी आदेश’ आणि अन्नसुरक्षा कार्यपद्धती (SOP) लागू केली आहे. या आदेशाचा उद्देश उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे नसून, उत्सवांदरम्यान वितरित किंवा विक्री होणारे अन्न सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत आहे की नाही, याची खातरजमा करणे हा आहे, असे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जारी करण्यात आलेल्या आदेशाबाबत काही गैरसमज निर्माण झाले आहेत. मात्र, कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे FDAने स्पष्ट केले आहे. हा आदेश सर्व धर्म आणि समुदायांच्या उत्सवांना समानपणे लागू राहणार आहे. विवाहसोहळे, भंडारे, ईद, नाताळ, नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारे कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी ही कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
‘आम्ही उत्सवांचे नियमन करत नाही, तर उत्सवांमध्ये दिले जाणारे अन्न सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करत आहोत,’ असे मुंढे यांनी सांगितले. अन्नसुरक्षेशी संबंधित कायदेशीर चौकट २०११ पासून अस्तित्वात असून, अन्न व्यवसाय चालकांची नोंदणी, परवाना आणि अन्नसुरक्षेचे नियम यापूर्वीपासूनच लागू आहेत.
हेही वाचा – राज ठाकरेंच्या दंगलीच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची सहमती; ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय’
वर्षभरासाठी अंमलबजावणी दिनदर्शिका
अन्नभेसळीविरोधात गेल्या काही महिन्यांपासून FDAने कारवाई तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्सवांच्या काळातील अन्नसुरक्षेवर पद्धतशीर लक्ष ठेवण्यासाठी ‘उत्सवासंदर्भातील अंमलबजावणी दिनदर्शिका’ तयार करण्यात आली आहे.
यापूर्वी विविध उत्सव जवळ आल्यानंतर स्वतंत्रपणे अन्नसुरक्षेच्या सूचना जारी केल्या जात होत्या. आता त्याऐवजी वर्षभरासाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामुळे अधिकारी, अन्नविक्रेते, केटरर्स, अन्न व्यवसाय चालक आणि कार्यक्रम आयोजक यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट होणार असून नियमांच्या अंमलबजावणीतील संभ्रम कमी होण्यास मदत होणार आहे.
भंडारे आणि प्रसादावर बंदी नाही
ही मानक कार्यपद्धती धर्मनिरपेक्ष आणि उत्सव-निरपेक्ष असून कोणत्याही समुदाय किंवा उत्सवाशी भेदभाव केला जाणार नाही. भंडारे, प्रसाद किंवा सामुदायिक अन्नवाटपावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. गणपतीसह अन्य धार्मिक उत्सव, धार्मिक विधी किंवा परंपरांमध्येही हस्तक्षेप केला जाणार नाही, असे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.




