सुप्रिया सुळेंकडे OBC प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा दावा; सुळेंचा तीव्र पलटवार
‘धादांत खोटा आरोप, पुरावा द्या किंवा जाहीर माफी मागा’; काँग्रेसच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंची नाराजी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा आरोप धादांत खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच वडेट्टीवार यांनी पुरावा सादर करावा, अन्यथा जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपासंदर्भात वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी केवळ विखे पाटीलच नव्हे, तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा त्यांनी केला. याचवेळी सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवल्याचे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. “विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. त्यांना ही माहिती कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करावे,” असे सुळे यांनी म्हटले.
हेही वाचा – ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’; आदिवासी विद्यार्थ्यांना मंत्री झिरवळांचा अजब सल्ला
“माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा करत असतील, तर त्यासंदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करून तो सिद्ध करावा. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वडेट्टीवार यांचे वक्तव्य ऐकून त्यांना धक्का बसला. “माझ्याकडे माझे जन्म प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र आणि बारामतीच्या खासदार म्हणून मिळालेले प्रमाणपत्र आहे. मात्र, माझ्याकडे कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“मी कधीही काँग्रेसला टार्गेट केलेले नाही. उलट नेहमीच काँग्रेसची पाठराखण केली. तरीही काँग्रेसकडून रोज माझ्यावर आरोप का केले जात आहेत, हे समजत नाही,” अशी खंतही सुळे यांनी व्यक्त केली.
वडेट्टीवार यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेत्यांच्या अशा भूमिकेमुळेच २०१४ मध्ये सरकार गेले, असा पलटवार त्यांनी केला.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली. “एखादी गोष्ट नियमात बसत असेल, तर त्यात वावगे काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद पुन्हा एकदा समोर आला असून, सुप्रिया सुळे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.




