पवना धरण ९५ टक्के भरले! आज सकाळी ९ वाजल्यापासून विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी- चिंचवड | पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणाची वाढती पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (२४ जुलै) सकाळी ९ वाजल्यापासून पवना नदीपात्रात विद्युत गृहाद्वारे ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती पवना धरण प्रकल्प प्रशासनाने दिली आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील आवक लक्षात घेता, नदीपात्रातील हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून ५ हजार क्युसेकपर्यंत नेला जाण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. विसर्गात होणाऱ्या बदलांबाबतची माहिती वेळेनुसार देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा
काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पवना नदी खोऱ्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प पवनानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.





