Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर’; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

लातूर : सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याकरिता विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, नगराध्यक्ष ॲड. स्वप्नील व्हत्ते, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, उपविभागीय अभियंता सूरज गौंड, दिलीप देशमुख, बाबासाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. लवकरच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. समाजातील तळागाळातील घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अहमदपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, याकरिता सौरकृषी पंप देण्यात येत असून नवीन विद्युत उपकेंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

अहमदपूर शहरात विविध प्रशासकीय इमारतींची उभारणी होत असल्याचे सांगताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पंचायत समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासोबत निर्माणाधीन इमारतींचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात सहकार भवन उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचे कामही लवकरच सुरू होईल. नागरिकांना प्रशासकीय सुविधा देणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून २० निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष ॲड. स्वप्नील व्हत्ते, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, बाबासाहेब कांबळे व दिलीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी गोविंद कुंभार यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button