Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

बँकॉकमध्ये हाहाकार! पबमध्ये भीषण स्फोटानंतर आग, २७ जणांचा होरपळून मृत्यू

Bangkok Pub Fire | थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका पबला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत किमान २७ लोकांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘असोसिएटेड प्रेस’ने (AP) यासंदर्भातील वृत्त दिले आहे. थायलंडच्या राजधानीच्या उत्तर भागात असलेल्या ‘ना लाडप्राओ’ पबमध्ये ही दुर्घटना घडली. पबच्या मुख्य प्रवेशद्वारातून आगीच्या भयानक ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडत असताना लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असल्याचे हृदयद्रावक दृश्य आपत्कालीन पथकांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे.

बचाव पथकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास या भीषण आगीची माहिती मिळाली. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट देऊन २७ जणांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये परफॉर्म करणाऱ्या एका संगीतकाराने (म्युझिशियन) सांगितले की, वीज पुरवठा खंडित होण्याच्या काही सेकंद आधी त्याने स्टेजजवळ असलेल्या सर्किट ब्रेकरमधून धूर निघताना पाहिला होता. त्यानंतर लगेचच एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण इमारतीत अतिशय वेगाने दाट धूर पसरला.

जीव वाचवण्यासाठी गेलेल्यांचा स्वच्छतागृहातच अंत

पंतप्रधान अनुतिन यांनी सांगितले की, पबमध्ये आग लागल्यानंतर आणि धूर पसरल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही ग्राहकांनी पबच्या मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहांचा (Washrooms) आसरा घेतला आणि ते तिथे लपून बसले. मात्र, पबमध्ये धुराचे साम्राज्य एवढे प्रचंड होते की, त्या बंद जागेत या लोकांचा श्वास गुदमरला. त्यामुळे बचाव पथकाला अनेक मृतदेह पबच्या स्वच्छतागृहांमध्ये आढळून आले आहेत.

हेही वाचा

जेनिक सिनरचा ‘विम्बल्डन’वर पुन्हा ताबा! अंतिम सामन्यात झ्वेरेव्हला नमवत इतिहास रचला

६३ जण रुग्णालयात; २२ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

बँकॉकचे गव्हर्नर चडचार्ट सित्तीपुंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील ६३ जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी २२ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक पीडितांकडे कोणतीही ओळखपत्रे नसल्यामुळे किंवा अनेकजण गंभीर भाजल्यामुळे व बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

पब जळून खाक, नातेवाईकांचा आक्रोश

अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सुमारे पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, तोपर्यंत पबमधील फर्निचर आणि आतील संपूर्ण भाग जळून खाक झाला होता. इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर आपल्या बेपत्ता प्रियजनांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी पबबाहेर एकच गर्दी केली असून, त्यांच्यासाठी प्रशासनाकडून घटनास्थळी एक विशेष नोंदणी केंद्र उभारण्यात आले आहे. या आगीच्या अचूक कारणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button