जगावर पुन्हा युद्धाचं सावट! शांतता करार मोडताच अमेरिकेचे इराणवर भीषण हल्ले

US Iran War | अमेरिका आणि इराणमधील शांतता करार पूर्णपणे संपुष्टात आला असून दोन्ही देशांमधील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. “आज मध्यरात्रीच आम्ही इराणवर हल्ले करू,” असा इशारा दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा शब्द खरा ठरवला आहे. जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ वाहतुकीसाठी खुली करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने इराणवर क्षेपणास्त्रे आणि विमानांद्वारे भीषण हल्ले सुरू केले आहेत.
या हल्ल्यांमुळे इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील अनेक शहरे प्रचंड हादरली असून, काही भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. मंगळवारी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन मालवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे.
“इराणच्या आक्रमकतेला अमेरिकाच जबाबदार धरणार”
अमेरिकेच्या लष्कराने या कारवाईला अधिकृत दुजोरा दिला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) ‘X’ (ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “यूएस सेंट्रल कमांडच्या दलांनी इराणविरुद्ध अतिरिक्त लष्करी हल्ले सुरू केले आहेत. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नौकानयनाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता अधिक कमकुवत होईल. एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून मुक्तपणे प्रवास करणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर इराणने केलेल्या अन्यायकारक आक्रमणासाठी अमेरिका त्यांना पूर्णपणे जबाबदार धरत आहे.”
ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वरून थेट इशारा
हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणला थेट धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी लिहिले, “इराणने काल व्यापारी जहाजांवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा हा चोख बदला आहे. जर इराणने पुन्हा अशी हिंमत केली, तर यापुढील परिस्थिती त्यांच्यासाठी आणखी गंभीर आणि भयानक होईल.”
हेही वाचा
पालखी आगमनानिमित्त ९ जुलै रोजी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; अंतर्गत हलक्या वाहनांसाठी निर्बंध
आखाती देशांमध्ये हाय-अलर्ट; कुवेत, बहरीन हादरले
अमेरिकेने इराणवर केलेल्या या भीषण हल्ल्यांनंतर संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून इतर देशांनीही हाय-अलर्ट जारी केला आहे.
बहरीन: बहरीनच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागांमध्ये युद्धाचे सायरन वाजवण्यात आले आहेत. मंत्रालयाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि तातडीने जवळच्या सुरक्षित ठिकाणी (Bunkers) जाण्याचे आवाहन केले आहे.
कुवेत: कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे की, देशाची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence System) अचानक झालेल्या रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करत असून हाय-अलर्टवर आहे.
जागतिक पातळीवर तेलाची कोंडी?
या वर्षाच्या सुरुवातीला २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात लष्करी कारवाया सुरू केल्या होत्या. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल वाहतूक होते. मात्र, अमेरिकेचे हल्ले सुरू झाल्यानंतर इराणने या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण मिळवले होते, ज्यामुळे जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
जहाजांवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी इराणने अधिकृतपणे स्वीकारली नसली, तरी आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपले पारडे जड करण्यासाठी तेहरान अशा छुप्या कारवायांचा वापर करत आहे. मात्र, अमेरिकेच्या या नव्या हल्ल्यांमुळे आखाती देशांतील हे युद्ध जागतिक युद्धाचे रूप घेते की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.





