राज्यात मान्सूनचा दणका! पुणे आणि पालघरला ‘रेड अलर्ट’

पुणे | जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत असून, यामुळे बळीराजासह सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) २ ते ७ जुलै या कालावधीत राज्यातील पावसाची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनला बळ देणाऱ्या दोन मोठ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे हा पावसाचा जोर वाढला असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून १ जूनपासून आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा ४१ टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद आहे, मात्र या आठवड्यात ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे.
दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून थेट कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर कमी दाबाची एक लांब पट्टी (Off-Shore Trough) सक्रिय झाली असून, ती पुढील आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरात ३ जुलैच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
हेही वाचा
पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
आज मुसळधार पावसाचे इशारे कुठे?
पालघर आणि पुणे घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून आज ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे, तर कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, रायगड, मुंबई, ठाणे, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, बुलढाणा आणि आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, नाशिक घाट विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.





