ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘इंद्रायणी आमची नदीमाता’ : नदी सुधार प्रकल्पाचे स्वागत

नगरसेविका सारिका गायकवाड यांची मागणी : ७ जुलैपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर नगरसेविका सारिका गायकवाड यांनी या निर्णयाचे स्वागत करत, येत्या ७ जुलैपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत केली.

यावेळी बोलताना सारिका गायकवाड म्हणाल्या की, “इंद्रायणी ही केवळ नदी नसून आमची नदीमाता आहे. देहू आणि आळंदी या जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये दरवर्षी लाखो वारकरी, भाविक आणि पर्यटक येत असतात. नदी सुधार प्रकल्पामुळे इंद्रायणीचे पाणी अधिक स्वच्छ होईल, नदीचे प्रदूषण कमी होईल आणि नदीकाठच्या नागरिकांना अधिक निरोगी व स्वच्छ वातावरण मिळण्यास मोठी मदत होईल. हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनाबरोबरच धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.

हेही वाचा –  ‘‘नमामी इंद्रायणी’’ : नदी सुधार प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी!

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लवकरात लवकर काम सुरू होणे आवश्यक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ जुलैपूर्वी भूमिपूजन झाल्यास प्रकल्पाला गती मिळेल आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील.

यावेळी सारिका गायकवाड यांनी सांगितले की, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हा आमदार महेशदादा लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्षात आणलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, ही त्यांच्या विकासदृष्टीची स्वप्नपूर्ती आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल आमदार महेशदादा लांडगे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. स्थायी समितीच्या मंजुरीमुळे आता इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून, नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि भाविकांसाठी स्वच्छ व पवित्र नदी परिसर उभारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“इंद्रायणी ही आमची श्रद्धास्थान असलेली नदीमाता आहे. देहू-आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ, निर्मळ आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणीचे दर्शन घडावे, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळणे हा ऐतिहासिक निर्णय असून, नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांच्या सोयीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या दूरदृष्टीचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम आहे. आता या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ जुलैपूर्वी भूमिपूजन होऊन कामाला तातडीने सुरुवात व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे.”

– सारिका गायकवाड, नगरसेविका, भाजपा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button