हिंजवडीत भरधाव दुचाकीचा भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

पिंपरी | हिंजवडीतील आयटी पार्क परिसरातील डीएलएफ सर्कलजवळील मेट्रो स्टेशन परिसरात रविवारी (२१ जून) पहाटे एक अत्यंत भीषण दुचाकी अपघात घडला. भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश सहदेव पोटदुखे (वय २६, रा. वाकड) हा रविवारी पहाटेच्या सुमारास आपली बजाज कंपनीची दुचाकी (क्र. एमएच १४ एमडब्ल्यू ०७५६) घेऊन हिंजवडी परिसरातून जात होता. पहाटे सुमारे २.११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी डीएलएफ सर्कलजवळील मेट्रो स्टेशन परिसरात आली असता, ऋषीकेशचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला अत्यंत जोराने जाऊन धडकली.
हेही वाचा
१८ वर्षीय लामिन यामालचा फिफा वर्ल्डकपमध्ये धमाका! लिओनेल मेस्सीचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडीत
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीच्या मागे बसलेला तरुण अक्षय राजेंद्र कावरे (वय २३) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर चालक ऋषीकेश यालाही अंतर्गत आणि बाह्य गंभीर मार लागला. अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मृत दुचाकी चालक ऋषीकेश याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
या भीषण अपघातामुळे वाकड आणि हिंजवडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, रात्री-अपरात्री वाढणारा भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालन पुन्हा एकदा निष्पाप तरुणांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे.





