राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्मार्ट उपस्थिती’, Botद्वारे ऑनलाईन हजेरी १५ जूनपासून अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

वर्धा : शिक्षक किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हजेरी पट ही संकल्पना आता केव्हाच काळबाह्य झालेली. नवी बायोमेट्रिक प्रणाली अंमलात आलेली. तसेच आता विद्यार्थी हजेरी शिस्तीत येणार. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आदेश काढला आहे.
राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या १००% विद्यार्थ्यांची उपस्थिती आता ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी लागणार आहे. विद्या समीक्षा केंद्राच्या ‘SwiftChat’ या ॲप्लिकेशनमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ या Bot च्या माध्यमातून ही हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त सच्छिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.) यांनी डिजिटल स्वाक्षरीने याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, राज्याचे विद्या समीक्षा केंद्र आता थेट राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राशी जोडले गेले आहे. त्यामुळे ‘6A framework’ अंतर्गत (हजेरी, मूल्यमापन, मानांकन, प्रशासन, अनुकूल शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – AI) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे Real-Time पद्धतीने संनियंत्रण केले जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच, नागपूर आणि अमरावती विभाग (विदर्भातील ११ जिल्हे) वगळता राज्यातील इतर सर्व विभागांमधील शाळांमध्ये १५ जून २०२६ पासून ही ऑनलाईन उपस्थिती सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, विदर्भातील सर्व शाळांना ३० जून २०२६ पासून नियमितपणे १००% ऑनलाईन उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.
हेही वाचा – भारताच्या ‘DNA’मध्येच नाविन्यता : फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
शिक्षकांनी लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांक, शाळेचा यु-डायस कोड आणि स्वतःचा शालार्थ आयडी वापरावा.
National Teacher Code चा वापर- ज्या शिक्षकांकडे शालार्थ आयडी नसेल, त्यांनी यु-डायस+ पोर्टलवरील १० अंकी ‘National Teacher Code’ च्या आधी ‘NTC’ लिहून लॉगिन करावे. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दुपारी १२.००, तर नियमित शाळांसाठी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत हजेरी नोंदवणे आवश्यक आहे. रात्रशाळांना रात्री ९.०० वाजेपर्यंत हजेरी नोंदवता येईल.
ॲपमध्ये विद्यार्थी न दिसल्यास शिक्षकांनी यु-डायस (U-DISE) प्रणालीमध्ये तातडीने विद्यार्थी प्रमोशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.अधिकारी स्तरावर होणार नियमित आढावा होणार. या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे ‘जिल्हा नोडल अधिकारी’ म्हणून काम पाहतील. त्यांना समग्र शिक्षा अभियानाचे प्रोग्रामर तांत्रिक मदत करतील. विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी जिल्हा स्तरावरून तर राज्य स्तरावरून मासिक आढावा बैठकीत या उपस्थितीचा नियमित आढावा घेतला जाईल. शिक्षकांना तांत्रिक अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी विशेष लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.





