सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

Rajendra Jain: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी मिळाली आहे. सुनील तटकरे यांनी घोषणा केली आहे. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एक निष्ठावान नेते असून, पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे संघटक मानले जातात. प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी, ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. तर, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये ते महत्त्वाचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या नावाची पक्षाच्या कोअर कमिटीत प्रबळ दावेदार म्हणून चर्चा झाली होती.
हेही वाचा – ‘राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरून जोरदार चर्चा रंगली होती. या जागेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपला आहे, असे स्पष्ट केले होते. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. रोहित पवार म्हणाले होते की, “या जागेवरून छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे, ती दिली गेली तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणावं लागेल, किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे, असा संदेश जाईल.” रोहित पवारांच्या या सल्ल्यावर सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला. “आमच्या पक्षात आम्ही उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत आम्हाला त्यांचा सल्ला घेण्याची पाळी आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात पहिले सल्ले द्यावे. त्यांचे संख्याबळ कसे वाढेल यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावे,” असे सुनील तटकरे म्हणाले.





