Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विषारी दारु प्रकरण! मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत; गिरीश महाजन यांची माहिती

Girish Mahajan : पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडीतील आणखी दोघांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयात नऊ जण दाखल असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. याप्रकरणात अतिउच्च अधिकारी दोषी असल्यास त्यालाही सोडले जाणार नसल्याचा इशारा मंत्री महाजन यांनी दिला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी यांनी शनिवारी फुगेवाडीला भेट दिली. मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले,  मिथेनॉलचे मिश्रण करून विषारी दारूची विक्री केली जात होती. ही दारू प्राशन केल्यामुळे पुणे आणि फुगेवाडीतील १९ जणांचा मृत्यू झाला आहे. निधन झालेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार आहे. रोजीरोटीसाठी त्यांना महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ जणांना निलंबित केले आहे. दारू विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. यापुढे एक थेंबही दारूची विक्री होणार नाही. यातील एकही दोषी सुटणार नाही, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

राजेंद्र सृजन टम्पो (वय ३६, रा. फुगेवाडी), बाबा शेख (वय ४५) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वी बारा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे. खाजप्पा शिंगे (वय ३५), पवन शेरसिंग चव्हाण (वय ३५) यांच्यासह नऊ जण विविध रुग्णालयात दाखल आहेत.

हेही वाचा –  ‘देशातील पहिल्या ‘एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रा’मुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दापोडी पोलिसांनी अटक केलेल्या कर्नेलसिंह विरकाला सरदार म्हणून फुगेवाडी परिसरात ओळखले जाते. मागील ४० वर्षांपासून तो दारू विक्रीचा धंदा करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणी तक्रार करत नव्हते. चाळीत घराच्या वरच्या बाजूला एक खोली बनवून त्यामध्ये तो गावठी दारूचे दुकान चालवत होता. घराच्या बाजूने रेल्वे लाईन गेल्याने लोक त्याच्याकडून दारू घेऊन रेल्वे रुळाच्या आजूबाजूला दारू प्राशन करित असत, मात्र मागील तीन महिन्यांपूर्वी रेल्वे विभागाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला पत्रे लावले. त्यामुळे लोक त्याच्या घराजवळ दारू प्राशन करित होते, असे स्थानिकांनी सांगितले.

पुणे शहराचा विद्येचे माहेरघर म्हणून नावलाैकिक असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खुलेआम दारूची विक्री हाेत आहे. गेल्या काही वर्षापासून ड्रग माफिया, कोयता गॅग उदयास आले आहेत. गेल्या महिन्यात फुगेवाडीत विषारी दारूमुळे तिघांचा मृत्यू झाल्यानंतरही पाेलिसांनी काेणतीच कारवाई केली नाही. तेव्हाच कारवाई केली असती तर माेठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे पाेलिसांचे केवळ निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार (ठाकरे) सचिन अहिर यांनी केली आहे.

विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि फौजदारासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथकाचे (गुन्हे) प्रमुख फौजदार राजू भास्कर आणि कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे यांचा निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेच्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले.  शहरातील सर्व हातभट्टी व्यवसाय बंद करण्याची मागणी महापौरांनी केली.

चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ जण विविध रुग्णालयात दाखल आहेत. आठ जणांची प्रकृती स्थिर असून एकाची चिंताजनक आहे, असे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button