Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यातून सातारा आता केवळ एका तासात! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा सहा हजार कोटींचा ‘मास्टरप्लॅन’

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र अलीकडे नित्याचे बनले आहे. ही कोंडी सोडवून पुणे ते सातारा हा प्रवास वेगवान करण्याचे पाऊल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलले आहे. हा प्रवास केवळ एक तासात होणार असून, यासाठी प्राधिकरणाने सहा हजार कोटी रुपयांचा मास्टरप्लॅन हाती घेतला आहे. याअंतर्गत उन्नत मार्गांसह विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिल्याने त्या दृष्टीने पावले पडू लागली आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावर पुणे शहराच्या परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावरील वाहतुकीला गती देण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गंत रावेत ते जांभूळवाडीपर्यंत उन्नत महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग सहापदरी असेल. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. तो मंजुरीसाठी प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे दिल्लीत मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील महिन्यात याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा –  ‘उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारापर्यंत अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. तसेच, काही उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढणार आहे. खंबाटकी घाटात नवीन बोगदा तयार करण्यात आला असून, या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने लवकरच वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे ते सातारा प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होणार आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे असून, ते एकसमान नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्यासह तो एकसमान करण्याचे काम सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पुणे-बंगळुरू महामार्गावर सध्या दोन्ही बाजूला डांबरी सेवा रस्ते आहेत. त्यांची रुंदी साडेपाच मीटर आहे. या महामार्गावर खेड शिवापूर ते देहूरोडदरम्यान काँक्रीटचे सेवा रस्ते केले जाणार आहेत. या रस्त्यांची रुंदी साडेदहा मीटर असणार आहे. यामुळे या महामार्गावर चारपदरी सेवा रस्ते निर्माण होतील. महामार्गांवरील गावातील वाहतूक या सेवा रस्त्यांवरून होईल. त्यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button