नाव बदललं, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली अन्…; सलमान खानच्या ‘मातृभूमी’ सिनेमाचे होतंय पुन्हा शूटिंग?

Salman Khan Matrubhoomi Movie Postponed : सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या राजा शिवाजी सिनेमातील भूमिकेमुळे चर्चेत होता. त्यानंतर पापाराझींबरोबर झालेल्या वादामुळे तो चर्चेत होता. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पापाराझींनी त्याची माफीसुद्धा मागितल्याचे पाहायला मिळाले होते.
याबरोबरच, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी याआधी सिनेमा १७ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे, भारत-चीन संघर्षावर आधारित अनेक चित्रपटांची अशीच अवस्था झाल्याचे दिसून येते.
मिड-डेच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री भाग्यश्रीचे पती आणि निर्माते हिमालय दासानी यांना ‘द लायन ऑफ गलवान’ हा सिनेमा बनवायचा होता. यामध्ये त्यांचा मुलगा अभिमन्यू प्रमुख भूमिकेत असणार होता. २०२० मध्ये भारतीय आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या वीर चक्र विजेते जवान गुरतेज सिंग यांच्यावर आधारित होता. मात्र, हा प्रोजेक्ट अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.
हेही वाचा – पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे वितरण
एका प्रकाशनाशी बोलताना हिमालय दासानी म्हणाले, “आज भारत-चीनचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे, आम्हाला चित्रपटाच्या कथानकावर पुन्हा विचार करावा लागेल. पटकथेचे काम पूर्ण झाल्यानंतर शूटिंग सुरू करण्यापूर्वी आम्हाला ती भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडे सादर करावी लागेल. तसेच, चित्रपटामध्ये चीनवर टीका करता येणार नाही असे त्यांच्याकडून आम्हाला निर्देश मिळाले आहेत. त्यामुळे, आम्हाला त्या पैलूवर पुन्हा विचार करावा लागेल.”
ते पुढे म्हणाले, “जर आम्हाला संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळणार नसेल, तर गलवानच्या लढाईची कथा सांगण्यात काही अर्थ राहणार नाही. जर ती लढाई आणि त्यामागील कारणे अस्तित्वातच नसतील, तर त्यावर चित्रपट बनवून काय उपयोग? त्यामुळे आम्ही तो विषय बाजूला ठेवला आहे.”
मातृभूमीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्यामुळे सिनेमाचे पुन्हा शूटिंग करत आहे का, अशा चर्चा होत आहेत. तर, काही रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या काही भागांचे पुन्हा शुटिंग केले जात आहे. सलमानच्या या चित्रपटाचा टीझर डिसेंबर २०२७मध्ये समोर आला होता. यामध्ये २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षाची झलक पाहायला मिळाली. यामध्ये हा सिनेमा १७ एप्रिल २०२६ ही प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती.
याबरोबर सुरुवातीला या सिनेमाचे नाव बॅटल ऑफ गलवान असे होते. त्यानंतर १६ मार्चला सिनेमाचे नाव बदलण्यात आले. आता याचे नाव मातृभूमी मे वॉर रेस्ट इन पीस असे आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.





