Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या; मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा’; पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वीजे संबंधित मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग मंडळ अंतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती व विविध अडचणी संदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे तसेच सर्व शाखाधिकारी व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले की, नियोजित वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. अचानक वीज पुरवठा बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पारदर्शकता ठेवून जनतेला वेळोवेळी अधिकृत माहिती देण्यात यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भुमिगत वीज वाहिन्यांची कामे तातडीने कार्यान्वित करावीत तसेच वीज यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व मान्सूनपूर्व उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्र-दक्षिण कोरिया भागीदारीतून कौशल्य विकासाला नवे बळ मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपत्कालीन परिस्थितीत सर्व शाखाधिकारी, उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंते व अधीक्षक अभियंते यांनी नागरिकांशी सतत संपर्कात राहून विद्युत पुरवठ्यासंदर्भातील अधिकृत माहिती द्यावी. लोकांचे फोन वेळेवर उचलून त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधावा व तक्रार निवारणात कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सातत्याने समन्वय ठेवून कामकाज करावे. नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा देण्यासाठी प्रशासन व महावितरण यंत्रणेने अधिक जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button