नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आरसीसीच्या फलकाची तोडफोड
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात संताप

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद उमटू लागले असून, आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी फलकाची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब गजधने ब्रह्मानंद जाधव,प्रसाद दौंडकर उपस्थित होते.
नीट -यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मोटेगावकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोचिंग संस्थांपैकी एक असलेल्या आरसीसीचे प्रमुख आहेत. लातूर पॅटर्नमधील मोठे नाव म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, पेपरफुटी प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा
“आर्थिक वादळ येणार”; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आरसीसी संबंधित फलक फोडून निषेध नोंदवला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही”, “शिक्षण क्षेत्रातील माफियांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणा देण्यात आल्या. सतीश काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देतात. मात्र पैशांच्या जोरावर पेपरफुटी करून काही जण विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा प्रवृत्तींचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडेही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच नीट सारख्या राष्ट्रीय परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्र पारदर्शक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, सीबीआय च्या तपासात आरसीसी संस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याची चर्चा आहे. तपास यंत्रणांनी मोटेगावकर यांच्या निवासस्थानी व संस्थांमध्ये चौकशी केली असून, अनेक डिजिटल पुरावेही जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.





