ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

हवेली ग्रामीणमधील 13 गावे पिंपरी-चिंचवड शहर नगर भूमापन कार्यालयाशी जोडणार!

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मान्यता : भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी आणि किवळे या गावांना नगर भूमापन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याशी संलग्न करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यास मंजुरी दिल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी ही गावे हवेली ग्रामीण भूमी अभिलेख कार्यालयाशी संलग्न असल्यामुळे जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड तसेच विविध अभिलेख कामांसाठी नागरिकांना वारंवार हवेली कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 18 मार्च 2025 रोजी दिलेल्या निवेदनात त्यांनी संबंधित गावे नगर भूमापन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याशी संलग्न करण्याची मागणी केली होती. या प्रस्तावावर मंत्रीस्तरावर स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात येत असून, अधिकृत आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे संबंधित गावांतील नागरिकांना जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, अभिलेख दुरुस्ती आदी सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. परिणामी शासकीय कामकाज अधिक सुलभ होऊन नागरिकांची पायपीट थांबणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, या निर्णयाबद्दल आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले असून, “पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड आणि भूमी अभिलेखाच्या कामांसाठी हवेली कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आता संबंधित गावे नगर भूमापन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याशी संलग्न करण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांची पायपीट थांबणार असून वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. सर्व शासकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button