Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : गतवर्षी जून महिन्यामध्ये आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉनातील 16 नाविण्यपूर्ण उत्पादनांपैकी निवडलेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत सुरु आहे. या वर्षी विविध राज्यातील सुमारे 1 हजार 300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 867 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. यामुळे अ‍ॅग्री हॅकॅथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुणे हे विद्येच्या माहेरघरासोबतच कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. संयुक्त राष्ट्राने यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असून या पार्श्वभुमीवर राज्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये अधिकाधिक महिला शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील दुसऱ्या पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रीनरोड इनोवेशन इस्रायलचे अध्यक्ष शफरीर गोडेल, जुरी कमिटी सह अध्यक्ष प्रा. डॉ. के. ई. लवांडे, डॉ. राजाराम देशमुख, सुपर जुरी तथा महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. उमाकांत दांगट आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात देशात आघाडीवर असलेलं राज्य असून ऊस, साखर, भाजीपाला उत्पादन आणि फलोत्पादनात तसेच कृषी निर्यातीतदेखील अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण’ (एआय पॉलिसी) जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एआय पॉलिसीकरीता सन 2025 च्या अर्थसंकल्पात यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करुन ठेवली होती. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळेच बारामती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृत्रिम बुद्धीमत्ता केंद्र उभारण्यात आले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी समृद्धी योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थसंकल्पात 2 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खतांची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.

हेही वाचा –  ‘समाजाधारित शिक्षण परंपरा भारतीय शिक्षणव्यवस्थेची ताकद’; स्मृती इराणी

हॅकॅथॉन ही संकल्पना प्रामुख्यानं माहिती व तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रात वापरली जात होती, कृषी क्षेत्रातील विविध नवनवीन उपाययोजना पुढे येऊन कृषी विकासात त्याचा फायदा होईल, याच धर्तीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून अ‍ॅग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संकल्पनेला भक्कम पाठिंबा दिला. गतवर्षी जून महिन्यामध्ये पुणे अ‍ॅग्री हॅकॅथॉनचे प्रथमच आयोजन करण्यात आले आणि ते यशस्वी देखील झाले. या हॅकॅथॉनमध्ये 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांची निवड करण्यात आली आणि विजेत्यांना मोठी पारितोषिकंही देण्यात आली. आजच्या घडीला 16 पैकी 12 उत्पादनांना कृषी विद्यापिठांचे प्रमाणीकरण प्राप्त झाले आहे. यशस्वी नवतंत्रज्ञांन कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यासारख्या संस्था सहकार्य करीत आहेत. निवडलेल्या उत्पादनांपैकी 4 उत्पादनांना कृषी, यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु आहे.

यावर्षीच्या हॅकॅथॉन स्पर्धेसाठी 9 विषयांचा समावेश आहे. यावर्षी विविध राज्यातील सुमारे 1 हजार 300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्र राज्यातून ८६७ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या पुणे ॲग्री हॅकॅथॉनचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राज्याचा कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हॅकॅथॉनमध्ये सहभागी उत्पादन, संशोधन, प्रयोग या शेतकऱ्यांकरिता उपयुक्त असून याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

बदलत्या काळानुरुप शेतकऱ्यांसमोर अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई, मातीची निकृष्टता, बाजारपेठेतील अस्थिरता, हवामान बदल आणि वाढता उत्पादन खर्च यासारखी विविध आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, नवकल्पना आणि युवकांच्या उर्जेचा योग्य वापर खरा उपाय ठरेल. ॲग्री हॅकॅथॉन मध्ये सहभागी युवक, अभियंते, डेटा साइंटिस्ट, कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योजक कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता वापरतील. आपल्या उपायोजना, नवकल्पना शेतकऱ्यांच्या शेतात, मोबाईल अ‍ॅपमध्ये, ड्रोनमध्ये, सेन्सर्समध्ये आणि एआय आधारित प्लॅटफॉर्ममध्ये प्रत्यक्षात वापरले जातील. कृषी विभागानं या हॅकॅथॉनसाठी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत, त्याबद्दल कृषी विभागाचे आणि सर्व आयोजकांचे अभिनंदन करुन त्या म्हणाल्या, आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र हे कृषी नवकल्पनांचे केंद्र बनेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.

डॉ. लवांडे म्हणाले, कृषी क्षेत्रातील अडीअडचणी नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून सोडविण्याच्या दृष्टीने सन 2025 पासून ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ चे आयोजन करण्यात येत आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026 मध्ये सहभागी होण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी ‘आयमॅट’ संस्थेच्यावतीने करण्यात आली. शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश, हॅकॅथॉनमध्ये कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा नवकल्पांना समावेश, विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन केंद्र उभारणी आदी विषयांच्या अनुषंगाने श्री. लवांडे यांनी सूचना केल्या.

श्री. डुडी म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने  गतवर्षीपासून ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ चे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये 16 नाविन्यपूर्ण उत्पादनाची निवड करण्यात आली असून या सर्व उत्पादनांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ आणि कृषी विभागामार्फत करण्यात आली. यशस्वी उत्पादन शेतापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.

पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026 करिता गतवर्षीच्या तुलनेत अडीचपट अर्ज प्राप्त आहेत. यावरुन या स्पर्धला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. अर्जाची तज्ज्ञामार्फत तपासणी करुन 15 उत्पादनांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी जवळपास 123 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी उत्पादकांना पारितोषिके देण्यात येणार असून त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या स्पर्धेत मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने या 9 विषयाशी निगडित आहे. या हॅकेथॉनचा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button