ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘शिक्षणाच्या आरक्षित जागांचे खाजगीकरण थांबवा’; चेतन बेंद्रे

पुनावळे येथील शाळेची जागा लीजवर देण्यास नागरिकांचा विरोध

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पुनावळे येथील सर्व्हे नं. ३८ पै. व ४४ पै. मधील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली सुमारे ९१ गुंठे जागा ३० वर्षांसाठी खाजगी संस्थेला लीज तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला सामाजिक कार्यकर्ते चेतन बेंद्रे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार सदर जागा ही सार्वजनिक माध्यमिक शाळेसाठी आरक्षित आहे. ही जागा सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र आता हीच सार्वजनिक जागा खाजगी संस्थेला देण्याचा प्रयत्न म्हणजे शिक्षणाच्या व्यापारीकरणाला चालना देणारा निर्णय असल्याची टीका चेतन बेंद्रे यांनी केली आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने या विषयासंदर्भात महासभेकडे शिफारस केली असली, तरी अंतिम निर्णय घेताना सभागृहातील सर्व नगरसेवकांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताचा विचार करावा आणि या प्रस्तावाला एकमुखी विरोध करावा, असे आवाहन चेतन बेंद्रे यांनी केले आहे.

हेही वाचा –  वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड; BCCI कडून तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

“महापालिकेने स्वतः दर्जेदार आणि सुसज्ज माध्यमिक शाळा उभारण्याऐवजी सार्वजनिक मालमत्ता खाजगी संस्थांच्या ताब्यात देणे अत्यंत दुर्दैवी आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, व्यवसाय नाही. पुनावळे परिसर झपाट्याने विकसित होत असताना भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना सार्वजनिक शिक्षणाची गरज भासणार आहे. अशावेळी ३० वर्षांसाठी जागा लीजवर देणे म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय ठरेल,” असे चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे.

तसेच महानगरपालिकेने हा प्रस्ताव तात्काळ मागे घेऊन त्या जागेवर मनपाची स्वतःची आधुनिक माध्यमिक शाळा उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सदर निर्णयाविरोधात नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, असे आवाहनही चेतन बेंद्रे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button