BIG News : महापालिका अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांसाठी ५० हजार इंधन भत्ता प्रस्ताव दप्तरी दाखल!
‘‘महाईन्यूज’’ वृत्ताची घेतली दखल : महापौर रवि लांडगे यांचा बाकू दौराही रद्द
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिकेत पदाधिकाऱ्यांना दरमहा ₹५० हजार इंधन भत्ता देण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. संबंधित प्रस्ताव यापूर्वीपासूनच पुनर्विचाराधीन होता आणि तो अधिकृतरीत्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहराचे महापौर रवि लांडगे यांनी आपल्या X हॅडलवर दिली आहे. येत्या १५ मे २०२६ रोजी होणाऱ्या महासभेच्या इतिवृत्तात या निर्णयाची अधिकृत नोंद करण्यात येणार आहे.
सदर प्रस्तावाबाबत ‘‘महाईन्यूज’’ ने ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला महायुतीतील सेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून हरताळ?’’ या मथळ्याने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही याबाबत X हँडलवर भूमिका मांडली होती. त्याची दखल महापौर कार्यालय आणि प्रशासनाने घेतली आहे. वास्तविक, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष कोकणे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव मुख्य सभेत पाठवला. हा प्रस्ताव अजेंड्यावर होता. याबाबत वृत्तांकन केल्यानंतर महापौरांनी हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून हा निर्णय जनभावना, आर्थिक शिस्त आणि जबाबदार प्रशासन यांचा विचार करून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इंधन भत्ता प्रस्तावावर विरोधकांसह विविध स्तरांतून टीका होत होती. शहरातील विकासकामे, आर्थिक प्राधान्यक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांवरील वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या भत्त्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, अधिकारी यांचे परदेश दौरे, महत्त्वाच्या बैठका ऑनलाईन घेणे असे आदेश काढत प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर लगेचच पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनीही महत्त्वाचा निर्णय घेत प्रस्तावित बाकू परदेश दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान Narendra Modi यांनी इंधन बचत, काटकसरीचे धोरण आणि जबाबदार प्रशासन याबाबत केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महापौर रवि लांडगे यांच्या या निर्णयाकडे प्रतीकात्मक आणि जनतेला सकारात्मक संदेश देणारे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. सार्वजनिक पैशांचा वापर अत्यंत जबाबदारीने व्हावा, तसेच लोकप्रतिनिधींनीही आदर्श घालून द्यावा, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि व्यापक जनहित या तत्त्वांशी कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षा आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल राखत निर्णय घेतले जातील, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि जबाबदार प्रशासनाबाबत केलेल्या आवाहनाचा आदर राखत आम्ही ५० हजार इंधन भत्ता प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, जनतेच्या पैशांचा काटकसरीने व पारदर्शकपणे वापर व्हावा, या भूमिकेतून प्रस्तावित बाकू दौरा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांचा विश्वास कायम राखणे आणि जनहिताला प्राधान्य देणे हीच आमची भूमिका राहील.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड.






