ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ : कुदळवाडीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सोमवारी पहाटे कुदळवाडी आणि परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया देत, “देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाई होणे आवश्यक होते. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे स्पष्ट केले.

लांडगे म्हणाले की, या कारवाईदरम्यान काही हिंदू धार्मिक स्थळांचेही नुकसान झाल्याची खंत आहे. मात्र, संबंधित स्थळे अधिकृत जागी आणि नियमानुसार पुनर्स्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

कुदळवाडी अतिक्रमण कारवाई; महापालिका आयुक्त काय म्हणाले पहा!

त्यांनी पुढे नमूद केले की, राष्ट्र सुरक्षा, इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने फेब्रुवारी २०२५ मध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही कारवाई करण्याचे धाडस दाखवले, असेही त्यांनी म्हटले.

कुदळवाडी परिसर आगामी काळात अतिक्रमणमुक्त करून ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगताना लांडगे यांनी, “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर बांधकामाला आम्ही समर्थन देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली.

तसेच, परिसरातील नागरिकांनी कोणताही धार्मिक तणाव निर्माण न करता पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.“जय श्रीराम… जय संविधान…!” अशा घोषवाक्यासह त्यांनी आपली प्रतिक्रिया समाप्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button