‘पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी’ उभारण्यासाठी पुढाकार!
भाजपा नगरसेविका कविता भोंगाळे यांची उपसूचना

– शहरातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचा संकल्प
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
शहराला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्यासाठी “स्पोर्ट्स सिटी” बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका कविता भोंगाळे यांनी शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज “स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी” उभारण्याची आग्रही मागणी केली.
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडलेल्या या प्रस्तावात शहराच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण विचार मांडण्यात आला. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती करत असताना क्रीडा क्षेत्रातही मोठी झेप घेण्याची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रस्तावित स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षणासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्रशिक्षक, तसेच शैक्षणिक संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे शहरातील खेळाडूंना व्यावसायिक मार्गदर्शन मिळून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा – आदिवासींच्या २४ शाळांची श्रेणीवाढ, सोलापूरला नवे अभियांत्रिकी महाविद्यालय; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय!
ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदके जिंकणारे खेळाडू घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असेही भोंगाळे पाटील यांनी नमूद केले. त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महानगरपालिकेत योग्य पदांवर नियुक्त करून त्यांचा सन्मान करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात मांडली. या उपक्रमामुळे शहरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, तरुण पिढीला प्रेरणा मिळेल आणि क्रीडा क्षेत्राला स्थिर करिअर म्हणून मान्यता मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारणीबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडला “स्पोर्ट्स सिटी” म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक प्रतिभावान खेळाडूला जागतिक दर्जाच्या सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर आपल्या शहरातून ऑलिम्पिक पदक विजेते घडणे अशक्य नाही. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देत, तरुणांना उज्ज्वल आणि सन्माननीय भविष्याची हमी देण्यासाठी आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत आहोत.
– कविता भोंगाळे, नगरसेविका, भाजपा, पिपंरी-चिंचवड महापालिका.





