IPL 2026 Points Table: गुणतालिकेत मोठा उलटफेर! टॉप ४ साठी ५ संघांमध्ये लढत; मुंबई इंडियन्स बाहेर?

IPL 2026 Points Table Update: आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला. दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा सामना पंजाब किंग्ज संघाविरुद्ध रंगला. या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने षटकार मारला आणि गुजरात टायटन्स संघाला विजय मिळवून दिला. पण या विजयानंतर गुणतालिकेतचं समीकरण आणखी किचकट झालं आहे. दरम्यान कोणता संघ कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.
रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर ७ गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने दाखवून दिलं, की आम्ही अजूनही स्पर्धेत टिकून आहोत. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर दमदार विजय मिळवला. आधी पंजाबचा संघ खूप पुढे होता. पण लागोपाठ सामने गमावल्यानंतर पंजाबचा संघ १३ गुणांसह पहिल्या स्थानी कायम आहे. पण इतर संघ पंजाबच्या खूप जवळ पोहोचले आहेत.
हेही वाचा – वजन कमी करण्याचं वेड धोकादायक; लोक गरजेपेक्षा जास्त बारीक होत आहेत, डॉक्टरांनी दिला इशारा
मुख्य बाब म्हणजे ४ संघ असे आहेत ज्यांनी आतापर्यंत १२ गुणांची कमाई केली आहे. सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि आता गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी १२-१२ गुणांची कमाई केली आहे. आधी पंजाब किंग्ज संघ खूप पुढे होता. पण आता या ४ संघांपैकी कुठलाही संघ नंबर १ स्थानी जाऊ शकतो.
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी देखील ८-८ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे हे संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत ७ गुणांची कमाई केली आहे. आता कोणते ४ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





