Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर : भूकंपाच्या संकटाने हादरलेल्या लातूर जिल्ह्याने अत्यंत जिद्दीने स्वतःला पुन्हा उभे केले आणि आपली क्षमता सिद्ध केली. तोच जिद्दीचा वारसा पुढे नेत, आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत लातूरचे नाव अग्रभागी नेऊया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आणि महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले, महाराष्ट्राने गेल्या ६६ वर्षांत तंत्रज्ञान, उद्योग आणि शेती क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याचा विकास वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती विकास आणि जलसंधारणासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून गतवर्षी ७३० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी पूर, अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ९२८ कोटी २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

हेही वाचा –  ‘सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल’; पालकमंत्री संजय शिरसाट

प्रलंबित जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला असून या रुग्णालयाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. लवकरच याठिकाणी ५०० खाटांचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभे राहील. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी आणि आयुष्मान भारत- महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरजू रुग्णांवर कोट्यवधी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन व अधिक गतिमान झाल्याने रुग्णांना मदत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लातूर शहरासाठी ६० किलोमीटरचा रिंग रोड मंजूर असून, त्यासाठी ४८ किलोमीटर भूसंपादन पूर्ण झाले आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. आशियाई विकास बँकेच्या मदतीने जिल्ह्यात ८६ किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. अर्थसंकल्पात १४७ कोटी रुपयांची नवीन कामे मंजूर झाली आहेत, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले.

येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. भूकंपानंतर लातूरला पुन्हा उभे करणाऱ्या या मातीतील मुलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. लातूरचा विद्यार्थी नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा बनला पाहिजे, हेच आपले स्वप्न असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सध्या उन्हाळा अधिक तीव्र आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील पाणी टंचाईसाठी २० कोटी ९६ लाख रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. सध्या २ टँकर सुरु असून २५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यंदा एल- निनोमुळे कमी पाऊस अपेक्षित आहे, त्यामुळे खरीप हंगामासाठी विशेष तयारी केली जात आहे. पाणी टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेवून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका यांच्यासह विविध शासकीय विभागांचे चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button