पाकिस्तानात पेट्रोल साठा संपला; मंत्र्यांची धक्कादायक कबुली

Pakistan Petrol Crisis | इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या इंधन साठ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी देशाकडे सध्या कच्च्या तेलाचा केवळ ५ ते ७ दिवसांचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले असून ऊर्जा सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
‘समा टीव्ही’वरील ‘नदीम मलिक लाईव्ह’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, इराण-अमेरिका संघर्ष लवकर संपेल, असे संकेत दिसत नाहीत. या परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून पाकिस्तानची ऊर्जा व्यवस्था अधिक संवेदनशील बनली आहे.
हेही वाचा
विराट कोहलीचा ऐतिहासिक विक्रम; आयपीएलमध्ये ९००० धावांचा टप्पा गाठणारा ठरला पहिला फलंदाज
मुलाखतीदरम्यान त्यांनी खुलासा केला की, देशाकडे एका दिवसाचाही पेट्रोलचा साठा शिल्लक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठवणूक क्षमता वाढवणे आणि दीर्घकालीन ऊर्जा सज्जता मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतासारखी मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन साठा व्यवस्था पाकिस्तानकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जनतेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी शक्य तितक्या प्रमाणात अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ऊर्जा सुरक्षा सुधारण्यासाठी ३० दिवसांचा ‘क्रूड ऑईल प्रोग्राम’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पंतप्रधान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.





