Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी जूनमध्ये रणधुमाळी; विधान परिषद स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

मुंबई : कोरोनाची साथ आणि लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे गेली चार – साडेचार वर्ष रखडलेल्या विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या जून महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीसोबतच नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या एकूण १७ जागांच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाआघाडी पुन्हा आमने – सामने ठाकणार आहे.

कोरोनाचे संकट, इतर मागासवर्गाचे आरक्षण यामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपूनही त्यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करता येत नव्हत्या. आता राज्यातील बहुतांश स्थानिक निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांबाबतचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला सादर केला आहे. येत्या १२ मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या ९ जागांची आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जून महिन्यात अपेक्षित आहे. निवडणूक होऊ घातलेल्या १७ मतदारसंघाच्या नावाची आणि संबंधित मतदारसंघातील मतदारांच्या संख्येची माहिती आयोगाला पाठवण्यात आली आहे. या १७ मतदारसंघातील काही मतदारसंघात जिल्हा परिषदेचे सदस्य नसले तरी येथे ७५ टक्के मतदार संख्येची पूर्तता होत असल्याने निवडणूक घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम मे महिन्यात जाहीर होऊन प्रत्यक्ष मतदान जूनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

हेही वाचा –  अन्याय वाढतो तेव्हा जनताच दुर्गेचे रूप घेते, हे ममता विसरल्या!

विधान परिषदेच्या अहमदनगर, सोलापूर यासारख्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपली आहे. तर काहींची मुदत २०२४ मध्ये संपली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस आणि या वर्षीच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्याने विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागले आहेत.

दरम्यान, निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या १७ जागांमध्ये नागपूर पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे २०२२ मध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०२४ मध्ये ते विधानसभेवर निवडून आल्याने नागपूरची जागा सध्या रिक्त आहे. या जागेची मुदत १ जानेवारी २०२८ पर्यंत असल्याने येथे पोटनिवडणूक होईल.

विधान परिषदेचे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ आणि कंसात मतदारांची संख्या

सोलापूर (५९५), अहमदनगर (४६१), ठाणे – पालघर (१०५४), जळगाव (५२६), सांगली – सातारा (८५३), नांदेड (४३२), यवतमाळ (४०५), पुणे ( ७९८), भंडारा – गोंदिया (४५७), रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग (९४७), नाशिक ( ५८१), वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली (९७७), अमरावती (४५३), उस्मानाबाद – लातूर – बीड (१०५१), परभणी तथा हिंगोली (४६८) औरंगाबाद तथा जालना (५८०) आणि नागपूर (७६१)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button