लोकशाहीचा उत्सव; पश्चिम बंगालमध्ये ९१.७८, तर तमिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदान

West Bengal, Tamil Nadu Elections 2026 | मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल फेरतपासणी’ (SIR) मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात नावे वगळल्याच्या तक्रारींनंतरही पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये गुरुवारी विक्रमी मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९१.७८ टक्के, तर तमिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदान झाले असून दोन्ही राज्यांत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
२९४ सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभेतील १५२ मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार पडले. या निवडणुकीत १६७ महिलांसह एकूण १,४७८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून तीन उमेदवारांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. तरीही मतदान केंद्रांबाहेर दिवसभर लांबच लांब रांगा दिसून आल्या. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात सर्वाधिक ९३.१२ टक्के मतदान झाले, तर कूचबिहार (९२.०७ टक्के), बिरभूम (९१.५५ टक्के) आणि मुर्शिदाबाद (९१.३६ टक्के) या जिल्ह्यांमध्येही मतदानाची टक्केवारी नव्वदी पार गेली.
हेही वाचा :
तमिळनाडू राज्यातही मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. २३४ मतदारसंघ असलेल्या या राज्यात ८४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. सेलम जिल्ह्यात सर्वाधिक ८८.०२ टक्के मतदान झाले, तर चेन्नई (८१.३४ टक्के), मदुराई (७७.८९ टक्के) आणि कोईम्बतूर (८२.३३ टक्के) येथेही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले.
SIR मोहिमेमुळे मतदारसंख्या घट
तमिळनाडूमध्ये ‘SIR’ मोहिमेमुळे अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मतदारसंख्या घटल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये राज्यात ६.४१ कोटी मतदार होते; मात्र यंदा ही संख्या ५.७३ कोटींवर आली आहे. या पार्श्वभूमीवरही दोन्ही राज्यांमध्ये विक्रमी मतदान झाल्याने निवडणुकीत मतदारांचा उत्साह आणि सहभाग स्पष्ट झाल्याचे चित्र आहे.





