पिंपरी-चिंचवडमध्ये जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी अत्याधुनिक हॉल उभारण्याची गरज
नगरसेवक उदय गायकवाड यांची आयुक्तांकडे थेट मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, बॅडमिंटन आणि लॉन टेनिससाठी महापालिकेने स्वतंत्र आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या असतानाही, जिम्नॅस्टिकसारख्या महत्त्वाच्या आणि कौशल्यपूर्ण खेळासाठी आजतागायत एकही अधिकृत हॉल उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक समिती सदस्य व नगरसेवक उदय गायकवाड यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहून जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी स्वतंत्र हॉल उभारण्याची ठोस मागणी केली आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून जिम्नॅस्टिक खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांकडून सातत्याने हॉलची मागणी केली जात आहे. मात्र, केवळ जागेची पाहणी, प्रस्ताव आणि आश्वासनांपुरताच हा विषय मर्यादित राहिला असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
जिम्नॅस्टिक हा खर्चिक खेळ असून त्यासाठी लागणारी उपकरणे व व्यवस्था महागडी असतात. परिणामी, अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील खेळाडूंना खासगी अकॅडमींचा आधार घ्यावा लागत आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक गुणी खेळाडूंची प्रगती खुंटत असून काही खेळाडू खेळापासून दूर जात असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा – त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणारच!

महत्त्वाचे म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरातून दरवर्षी सुमारे १०० हून अधिक खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असून, त्यापैकी २५ ते ३० खेळाडू राष्ट्रीय स्तरावर शहराचे प्रतिनिधित्व करतात. मर्यादित आणि अपुऱ्या सुविधांमध्येही त्यांनी शहराचा नावलौकिक वाढवला असताना, जिम्नॅस्टिकला महापालिकेच्या क्रीडा धोरणात अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
येत्या काळात शहरात एरोबिक एशियन चॅम्पियनशिपसारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. अशा वेळी स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब असून, बाहेरील खेळाडूंशी स्पर्धा करताना स्थानिक खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक उदय गायकवाड यांनी महापालिकेकडे तीन ठोस मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये जिम्नॅस्टिक हॉलसाठी तातडीने योग्य जागा निश्चित करणे, आवश्यक निधी मंजूर करून बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करणे, तसेच प्रशिक्षक, खेळाडू आणि संबंधित संघटनांशी समन्वय साधून जिम्नॅस्टिकला महापालिकेच्या क्रीडा धोरणात प्राधान्य देणे, यांचा समावेश आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पिंपरी-चिंचवड शहराने अनेक खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र जिम्नॅस्टिकसारख्या महत्त्वाच्या आणि कौशल्यपूर्ण खेळासाठी आजही एकही अधिकृत हॉल उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आहे. खेळाडूंना योग्य सराव सुविधा मिळाल्यास अनेक खेळाडू देशासाठी पदके मिळवू शकतात. त्यामुळे जिम्नॅस्टिक खेळाडूंकरिता तातडीने स्वतंत्र व सुसज्ज हॉल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घ्यावा, अशी आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाम मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.”
— उदय गायकवाड,,नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका





