Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

सातारा : पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात साजरा होत असलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ हा संस्कृती, पर्यटन आणि उद्योजकतेचा संगम ठरत आहे. पारंपरिक कला, साहसी पर्यटन आणि अनुभवाधारित पर्यटन यांचा संगम साधत साताऱ्याच्या पर्यटन क्षमतेत भर घालण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन दि. २ एप्रिल रोजी पाटण तालुक्यातील नाडे या निसर्गरम्य गावात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराज देसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पंचायत समिती अध्यक्षा सरिता पवार, उपाध्यक्ष विजय पवार, सौ. विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोर्णा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, पर्यटन विभागाचे उपसंचालक भारत लांघी (पुणे विभाग), उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवाला राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटकांनी उपस्थिती दर्शवली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महोत्सवाची वाढती लोकप्रियता अधोरेखित होत आहे. उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी शाहीर संतोष साळुंखे, शाहीर प्रसाद विभुते, शाहीर डॉ. देवानंद माळी आणि शाहीर डॉ. निशिगंधा माने यांच्या पथकांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी वातावरण भारावून गेले.

दि. ३ एप्रिल रोजी भजन मंडळांच्या कार्यक्रमांनी रंगत वाढवली. ज्योतीताई श्याम गोराणे (जागर स्त्री शक्तीचा), अनिरुद्ध कारकर (श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ), अभिमन्यू पांचाळ (स्वर भजनी मंडळ) आणि आदिनाथ साटले गुरुजी (रंगी रंगे रे श्रीरंगे) यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

महोत्सवातील पशु-पक्षी प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरले असून ‘राधा’ ही जगातील सर्वात लहान पाणम्हैस पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील माळवाडी येथील ही म्हैस गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलेली असून तिची उंची केवळ ८३.८ सेंमी (२ फूट ८ इंच) आहे.

यंदाच्या कृषी प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाला विशेष स्थान देण्यात आले आहे. स्मार्ट सिंचन, पिकांचे निरीक्षण आणि प्रिसिजन फार्मिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळत आहे.

दि. ४ एप्रिल रोजी स्वरांजली ब्रास बँड (लालबाग, मुंबई), प्रभात ब्रास बँड (पुणे), अमर ब्रास बँड (बारामती) आणि सरस्वती ब्रास बँड (जालना) यांच्या सादरीकरणामुळे संगीताची मेजवानी लाभली.

हेही वाचा –  गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बोटिंग, पॅराग्लायडिंग, फूड फेस्टिव्हल, विविध प्रदर्शन आणि सफारी यांसारख्या उपक्रमांमुळे पर्यटकांना दिवसभर विविध अनुभव घेता येत आहेत.

दि. ५ एप्रिल रोजी होणारा लावणी महोत्सव हा आणखी एक विशेष आकर्षण ठरणार असून सायली केळकर, राधिका पाटील, शिवानी मुंबैकर, स्नेहा लखनगावकर, आशा रूपा परभणिकर आणि प्रिया काळे-नगरकर यांच्या सादरीकरणामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणी कलेचा बहारदार आविष्कार पाहायला मिळणार आहे.

महोत्सवाचा समारोप दि. ६ एप्रिल रोजी होणार असून या समारंभाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते कोयना नदीवरील नवीन सांगवड पूल, स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवन (दौलतनगर) आणि शिवाजीराव दौलत स्टेडियम यांसारख्या महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.

समारोपाच्या दिवशी मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभणार असून ईशा मालवीय, प्रविण तरडे, स्पृहा जोशी, प्रियांदर्शन जाधव, संस्कृती बालगुडे, गिरिजा प्रभू, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण, भाऊ कदम, हेमांगी कवी, अरुण कदम, रसिका वेंगुर्लेकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, कविता राम, तेजपाल वाघ, अभिजीत जाधव, अमू जाधव, पूनम कुडाळकर, अर्चना जावळेकर, नमिता पाटील आणि अस्मिता पुनेकऱ आदींचा सहभाग असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button