To The Point: मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी नगरसेविका सुलभा उबाळे यांची हमरीतुमरी!
स्थायी समिती सभापतींची सारवासारव: यमुनानगर येथील कै. मिनाताई ठाकरे तलावाच्या कामावरुन स्थायी समिती सभेत ‘‘लॉबिंग’’
पिंपरी-चिंचवड ! विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात भाजपा आणि प्रशासकीय सत्ताकाळात ठेकेदारांनी महापालिकेला लुटले? प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि महापालिका कर्जबाजारी झाली किंबहुना मर्जीतील ठेकेदारांना काम देण्यासाठी रिंग होते आणि सेटिंग होते, असा वारंवार दावा जाहीरपणे करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलभा उबाळे स्वत: च मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी स्थायी समिती सभापतींच्या दालनामध्ये हमरीतुमरीवर आलेल्या पहायला मिळाल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी सभापतींच्या दालनामध्ये चर्चा सुरू होती. बैठकीआधी स्विमिंग टँक टेंडरच्या मुद्द्यावरून प्रभाग १३ मधील नगरसेविका सुलभा उबाळे आणि भाजपाच्या नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती दोघांमध्ये खडाजंगी झाली.
विशेष म्हणजे, अर्थसंकल्पीय सर्वसाधरण सभेत महापालिकेतील पारदर्शी कारभारावर भाषणबाजी करणाऱ्या सुलभा उबाळे यांनी दुसऱ्याच दिवशी मर्जीतील ठेकेदारला काम मिळवून देण्यासाठी स्थायी समितीमध्ये राडा केला, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून यमुनानगर येथील कै. मिनाताई ठाकरे तलावाच्या कामावरुन अनेकदा प्रसारमाध्यमांमधून चर्चा झाली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. महापालिका निवडणुकीपूर्वीच या ठेकेदाराला निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. त्यामुळे हा विषय स्थायी समितीसमोर मान्यतेकामी आला होता.
दरम्यान, भाजपा नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पति अक्षय कारंडे यांनी संबंधित ठेकेदाराबाबत आक्षेप घेतला. सोलापूर येथे याच ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या आणि सदोष कामामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदरची निविदा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी स्थायी समिती सभापतींच्या दालनात केली. वास्तविक, त्यांची सौभाग्यवती नगरसेविका अर्चना कारंडे या स्थायी समितीच्या सदस्या आहेत.
यावर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका तथा महापालिका स्थायी समितीच्या सदस्या सुलभा उबाळे यांनी अक्षय कारंडे यांनी बैठकीत उपस्थित राहण्याचे कारण काय? त्यांना अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. हा विषय मंजूर करण्याचा त्यांनी आग्रह धरला. यावरून वादाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. “तुम्ही या बैठकीत कसे?” असा सवाल उपस्थित करत वाद अधिकच चिघळला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत संताप व्यक्त केला. वाद इतका वाढला की एकमेकांवर वैयक्तिक टीकाही करण्यात आली. अखेर संबंधित व्यक्ती संतापाच्या भरात बैठक सोडून बाहेर निघून गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक बापू घोलप, उत्तम केंदळे यांना सुलभा उबाळे यांनी संपर्क केला. तसेच, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनाही संपर्क करुन आपली बाजू मांडली. त्यानंतर अक्षय कारंडे यांनी स्वत:च्या मित्राला सदरचे काम द्यायचे आहे. त्यासाठी त्यांनी या विषयाला विरोध केला, असा दावाही त्यांनी केला.
तथापि, उन्हाळा आता दोन महिने आहे. त्यामुळे सदर जलतरण तलाव सुरू करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वादग्रस्त विषय तहकूब…
पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी पूर्व बैठकीत हा वाद झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आणि भाजपच्या नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडे यांच्यात बाचाबाची झाली. उबाळे यांनी उन्हाळ्यामुळे तलाव तातडीने सुरू करण्यासाठी निविदा मंजूर करण्याची मागणी केली. अक्षय कारंडे यांनी संबंधित ठेकेदाराविरोधात आक्षेप घेत निविदा मंजूर करू नये असे सांगितले. पूर्व बैठकीत गैरसदस्य (अक्षय कारंडे) उपस्थित राहिल्याने वाद वाढला. उबाळे यांनी फक्त सदस्यांनाच बैठकीत परवानगी असल्याचे सांगितले. अखेर सभापती व सदस्यांनी अक्षय कारंडे यांना बाहेर जाण्यास सांगितले. स्थायी समितीच्या मुख्य बैठकीत हा विषय तहकूब करण्यात आला. या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबियांचा हस्तक्षेप वाढत असल्याची टीका झाली. अधिकृत पद नसलेल्या व्यक्तींनी निविदा प्रक्रियेत भूमिका घेतल्याने निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेवटी सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, आता हा विषय तहकूब ठेवला आहे. या विषयावर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल.





