सोन्याच्या भावात 13 हजार रुपयांची तर चांदीत 32 हजार 700 रुपयांची घसरण, सोनं-चांदी स्वस्त, खरेदीसाठी सुवर्णसंधी?

Gold silver Price : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर दिसून येत आहे. गेल्या अवघ्या एका आठवड्यात सोने आणि चांदीच्या (Gold silver Price) दरात मोठी पडझड झाली आहे. सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १३,७०० रुपयांनी उतरले आहेत, तर चांदीच्या दरात प्रति किलो ३२,७०० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
आकडेवारी काय सांगते?
अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत ८.४७% आणि चांदीच्या किमतीत १२.४०% घट झाली आहे.
सोनं: १ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,७३,०९० रुपये होता, जो आता घसरून १,४५,९७० रुपयांवर आला आहे.
चांदी: महिन्याच्या सुरुवातीला चांदी ३,१५,००० रुपयांच्या उच्चांकावर होती, ती आता २,४५,००० रुपयांपर्यंत खाली आली आहे.
दर का घसरत आहेत? (मुख्य कारणे)
१. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे संकेत: अमेरिकेत व्याजदर प्रदीर्घ काळ चढे राहण्याची शक्यता आहे. जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी होते.
२. डॉलरची मजबूती: आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्यामुळे इतर देशांसाठी सोने खरेदी करणे महाग झाले आहे, परिणामी जागतिक मागणी घटली आहे.
३. चीनची भूमिका: जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनच्या मध्यवर्ती बँकेने (People’s Bank of China) सोन्याची खरेदी थांबवली आहे. यामुळे मोठे गुंतवणूकदार आता नफावसुली (Profit Booking) करत आहेत.
हेही वाचा – इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका; तब्बल २,५०० उड्डाणे रद्द, एअरलाईनची क्षमता ३० टक्क्यांवर!
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक मानव मोदी यांच्या मते, “भू-राजकीय तणाव आणि महागाईचा धोका यामुळे सोन्यावर दबाव आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्या आहेत, ज्यामुळे ऊर्जा-जनित महागाईची चिंता वाढली आहे. ‘होर्मुज सामुद्रधुनी’मधील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाचे दर चार वर्षांतील उच्चांकावर आहेत.
मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सध्या सोन्याची मोठी खरेदी करणे टाळावे. बाजार अजून खाली जाण्याची शक्यता असल्याने स्थिर होण्याची वाट पाहावी.एकदाच मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी, येणाऱ्या काही आठवड्यात किंवा महिन्यांत हळूहळू गुंतवणूक करावी. डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलातील चढ-उतारामुळे येणाऱ्या काळात सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता राहू शकते. सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली, तरी जागतिक तणावामुळे बाजार अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी बाजार पूर्णपणे स्थिर होण्याची वाट पाहूनच निर्णय घेणे हिताचे ठरेल, असंही काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.





