ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारण्यासाठी व्यापक उपाययोजना

महापौर रवि लांडगे यांचे निर्देश : पर्यावरण प्रेमी अन्‌ प्रशासनाची बैठक

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर व वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारण्यासाठी मा. महापौर रवि लांडगे यांनी ठोस भूमिका घेत शहरासाठी व्यापक उपाययोजनांचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पर्यावरण विषयक संस्था, तज्ज्ञ व विविध घटकांसोबत झालेल्या बैठकीत प्राप्त सूचना व सुचविलेले पर्याय यांच्या आधारे महापौरांनी मा. आयुक्त यांना निवेदनाद्वारे तातडीच्या व कडक कार्यवाहीचे निर्देश दिले.

शहरातील वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ तसेच कचरा जाळण्याच्या घटनांमुळे AQI चिंताजनक पातळीवर जात असल्याची गंभीर दखल घेत महापौरांनी प्रशासनाला जबाबदाऱ्या निश्चित करून परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांच्या निर्देशानुसार शहरात वायू गुणवत्ता मापन केंद्रांची संख्या वाढविणे, रिअल-टाईम AQI माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करणे, संवेदनशील भागांमध्ये विशेष मॉनिटरिंग व्यवस्था उभारणे यास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रभावी करणे, सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढविणे, ई-वाहनांना प्रोत्साहन देणे व प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा      :                  मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर पलटी; मोठा अनर्थ टळला

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित तपासणी, प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची सक्ती व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बांधकाम प्रकल्पांवर ग्रीन नेट व डस्ट बॅरियर अनिवार्य करणे, रस्त्यांची नियमित स्वच्छता व पाण्याची फवारणी सुनिश्चित करणे तसेच कचरा जाळण्यावर पूर्ण बंदी घालून कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महापौरांनी दिले आहेत.

याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, हरित पट्टे, शहरी वन व ऑक्सिजन पार्क विकसित करण्यावर भर देत दीर्घकालीन पर्यावरणीय संतुलन साधण्याचा महापौरांचा निर्धार व्यक्त करण्यात आला. AQI गंभीर पातळीवर गेल्यास “GRAP (Graded Response Action Plan)” तातडीने लागू करण्याचे ही निर्देश देण्यात आले आहेत.

“पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित हवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. AQI सुधारणा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण शहराची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, या विषयात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वय साधून ठोस आणि परिणामकारक कार्यवाही करावी, तसेच नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असा स्पष्ट व ठाम संदेश महापौर रवि लांडगे यांनी दिला.

कडक कारवाई करण्याचा इशारा…

“वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही पातळ्यांवर काम करणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही. नागरिकांचे आरोग्य सर्वोच्च प्राधान्य आहे,” असेही महापौरांनी यावेळी नमूद केले. महापौरांनी सर्व संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून नियमित आढावा बैठकीद्वारे प्रगती तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राबविण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांचा सविस्तर अहवाल (Action Taken Report) निश्चित कालावधीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील पर्यावरण संवर्धन, नागरिकांचे आरोग्य आणि शाश्वत विकास लक्षात घेऊन या सर्व उपाययोजनांची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button