पीसीपीच्या आर्य माडीवाले याला “ग्रॅव्हिटी २के२६ – पिच परफेक्ट” स्पर्धेत द्वितीय क्रमांक
शिक्षण विश्व: हेल्थकेअर आणि बायोटेक विभागात यश, रु. ३० हजारांचे पारितोषिक

पिंपरी-चिंचवड : पॅकबंद खाद्यपदार्थांची गुणवत्ता ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणारे “फूड डिकोड ए आय” हे मोबाईल ॲप विकसित करणाऱ्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने “ग्रॅव्हिटी २के२६ – पिच परफेक्ट” स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आर्य माडीवाले असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. ३०,००० रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पिसोळी येथे आयोजित करण्यात आली होती. विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील १८० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. हेल्थकेअर आणि बायोटेक, फिनटेक आणि ई-कॉमर्स, ॲग्रीटेक आणि ग्रामीण सक्षमीकरण, सस्टेनेबल सोल्युशन्स व स्मार्ट सिटीज, तसेच स्किल्स आणि एज्युटेक अशा विविध विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले.
आर्य माडीवाले याच्या ‘फूड डिकोड ए आय’ या प्रकल्पाला हेल्थकेअर आणि बायोटेक विभागात द्वितीय क्रमांक मिळाला. हे ॲप वापरकर्त्यांना पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील बारकोड स्कॅन करून संबंधित उत्पादनाचा न्यूट्री-स्कोर, फॅटचे प्रमाण व इतर पोषणमूल्यांची माहिती तत्काळ उपलब्ध करून देते. तसेच संबंधित पदार्थाला अधिक चांगला पर्याय कोणता असू शकतो, याचीही माहिती ॲपद्वारे मिळते.
पीसीईटी कार्यालयात अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते आर्य माडीवाले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीपीच्या प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड, तसेच संगणक विभाग प्रमुख मंगला माळकर उपस्थित होते.
उच्च् दर्जाच्या शिक्षण सुविधा…
या ॲपमधील ‘स्मार्ट कार्ट’ फीचरद्वारे खरेदी केलेल्या सर्व वस्तूंचे एकत्रित हेल्थ रेटिंग समजते. मधुमेहासारख्या आजारांबाबत आहार मार्गदर्शन, तसेच चॅटबॉटच्या माध्यमातून आरोग्यविषयक सल्ला देण्याची सुविधा देखील यात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसित व्हावी आणि त्यांच्या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा, यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) मार्फत उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आर्य माडीवाले यांच्या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी अभिनंदन करून संस्थेला त्याचा अभिमान असल्याचे सांगितले.





