Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका वाढत्या प्रदूषणामागील कारणे शोधणार; खासगी संस्थेची नियुक्ती

Share On

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाचा महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अभ्यास केला जाणार आहे. शहरातील हवा प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी एका अभ्यासक संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला ७५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

शहरातील हवा प्रदूषणात सातत्याने भर पडत आहे. रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांमुळेही हवा खराब होत आहे. धुळीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा प्रदूषणाने सातत्याने धोकादायक पातळी ओलांडली आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत जात आहे. त्यामुळे महापालिकेने उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात केली आहे.

केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत शहरांना हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी निधी दिला जात आहे. त्याअंतर्गत महापालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे.

हेही वाचा –  डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

वाढते हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणास कारणीभूत प्रदूषकांचा अभ्यास, त्यावर योग्य तो निकष काढून उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी प्रदूषणाचा अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून घेण्यात आला. प्रदूषणाचा अभ्यास करण्याकरिता महापालिकेने अभ्यास करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यामध्ये दोन संस्थांनी प्रस्ताव सादर केले. त्यांपैकी एका संस्थेचा प्रस्ताव मान्य केला. या संस्थेकडून हवा प्रदूषणाबाबतचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. ही संस्था केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांशी संलग्न आहे. या अभ्यासादरम्यान संस्थेमार्फत महापालिका अधिकाऱ्यांसाठी हवा प्रदूषणासंबंधी कामकाजासाठी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.

हवा प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेडिओचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी रेडिओवर १५ दिवसांसाठी जाहिरात करण्यात येणार असून, दहा लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना, राष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

बांधकाम प्रकल्पांमुळे शहराचे हवा प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील औद्योगिक, निवासी, व्यावसायिक आस्थापना असलेल्या परिसरातील प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. प्रदूषण किती होते, कशामुळे होते, याचा अभ्यास केला जाणार आहे. निरीक्षणांनुसार आराखडा तयार करून संस्था उपाययोजना सुचविणार आहे. त्यानुसार महापालिका कार्यवाही हाती घेणार आहे, असे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन निकम यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button