शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पात्र प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील.
त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. मात्र यानंतरही मतदारनोंदणी सुरु राहणार आहे. नागरिकांना २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत मतदारयादीविषयी दावे किंवा हरकती सादर करता येतील. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – देशभरात गारठ्याला सुरुवात, उत्तरेतून थंड वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय, महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या संकेतस्थळावरील ‘Manual’ या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.





