नांदेड विभागात सकाळपासून दिवसभर व्यापक तिकीट तपासणी मोहीम
रेल्वेतील फुकट्यांना पकडले चार लाखांचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात सोमवारी (ता. सहा) सकाळपासून दिवसभर व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकाच दिवशी १२०२ विनातिकीट, नियमबाह्य सामानासह प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यातून एकूण ४.९ लाख रुपयांचा दंड व तिकिटाची रक्कम वसूल करण्यात आली.
रेल्वेच्या या मोहिमेत मनमाड, छत्रपती संभाजीनगर, परभणी-परळी, परभणी-नांदेड, आदिलाबाद-मुदखेड आणि पूर्णा-अकोला या मार्गांवरील २१ एक्स्प्रेस व प्रवासी गाड्यांची तपासणी केली.
प्रमुख रेल्वेगाड्यांमध्ये सचखंड एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, बंगळुरू एक्स्प्रेस, नंदिग्राम एक्स्प्रेस, पनवेल एक्स्प्रेस, यशवंतपूर एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्स्प्रेस, नर-काचिगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, संबलपूर एक्स्प्रेस तसेच पूर्णा-आदिलाबाद, पूर्णा-अकोला आणि नरसापूर-नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस या प्रवासी गाड्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
ही मोहीम सहायक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बाराव यांच्या नेतत्वाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.जे. विजय कृष्ण, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक ईती पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या निर्देशानुसार राबविली. या मोहिमेत ३२ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांनी सक्रिय सहभाग घेतला. विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवणे, प्रवाशांमध्ये नैतिक भीती निर्माण करणे आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश होता.
रेल्वेच्या प्रवाशांना आवाहन
नांदेड विभागाकडून सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते, की नेहमी वैध तिकिटांसह प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी, अशा तीव्र तपासणी मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येतील, ज्यामुळे प्रामाणिक प्रवाशांना अधिक सुविधा आणि सुरक्षितता मिळेल.





