पुण्यात गुन्हेगारीचा कहर! ” मास्क मॅन “च्या रूपाने पिंपरी-चिंचवडमध्ये नवी दहशत!
भरदिवसा हातात धारदार चाकू घेऊन फिरतानाचा व्हीडिओ व्हायरल
पुणे/पिंपरी-चिंचवड : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे शहर अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमुळे अक्षरशः हादरत आहे. स्वारगेट बसमध्ये झालेला अत्याचार असो, ड्रिंक अँड ड्राइव्ह करत निष्पापांना उडवण्याचे प्रकार असोत, किंवा सार्वजनिक ठिकाणी नशेत अश्लील वर्तन करणारे तरुण – पुण्याचं शांत, संस्कारी शहर म्हणून असलेलं नाव आता गुन्हेगारी, बेशिस्तपणा आणि दहशतीने बरबटत चाललंय. ( मास्क मॅन )
या पार्श्वभूमीवर, आता पिंपरी-चिंचवड शहरात “मास्क मॅन” या अज्ञात इसमाने नव्याने दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. हा व्यक्ती चेहऱ्यावर मास्क घालून भरदिवसा हातात धारदार चाकू घेऊन फिरताना आढळून आला आहे, आणि नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
रस्त्यावर उघडपणे चाकूसह वावर
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, निगडीतील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ, मास्क मॅन रस्ता क्रॉस करताना एका नागरिकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. त्याच्या हातात धारदार चाकू होता.
या इसमाचा हेतू नेमका काय होता – एखाद्यावर हल्ला करायचा की फक्त दहशत पसरवायची – हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.
चेहरा झाकून ओळख लपवण्याचा प्रयत्न
हा व्यक्ती चेहऱ्यावर मास्क घालून फिरत असल्यामुळे त्याची ओळख पटवणं कठीण जात आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, त्याने जाणूनबुजून मास्क आणि काळे कपडे घातले होते, जेणेकरून कुणी त्याला ओळखू नये.
पोलिसांकडून तपास सुरू – नागरिकांमध्ये अस्वस्थता
पिंपरी-चिंचवड पोलीस यावर कायदेशीर कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप्स आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीचा अभ्यास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. पण अजून कोणतीही अटक झाली नसल्यामुळे “मास्क मॅन”ची धास्ती लोकांच्या मनात कायम आहे.
गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण – पुण्याची ओळख धोक्यात?
मास्क मॅनची ही घटना केवळ एकटीच नाही. याआधी मे महिन्यात पुण्यात ‘कोयता गँग’च्या दहशतीने शहर हादरलं होतं. भररस्त्यात, लोकांच्या नजरेसमोर कोयत्याने वार करून जीवघेण्या हल्ल्यांची मालिका घडली होती. त्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी शहरात गुन्हेगारीचं प्रमाण थांबण्याचं नाव घेत नाही.
प्रशासनासमोर मोठं आव्हान
पुणे-पिंपरीसारख्या शहरांमध्ये भरदिवसा अशी दहशत निर्माण करणारे घटक खुलेआम वावरू लागले आहेत, ही बाब चिंतेची आहे. “विद्येचं माहेरघर” म्हणून ओळख असलेल्या शहराला आता “गुन्हेगारांचं अड्डं” अशी नवी ओळख मिळणार का, असा सवाल उपस्थित होतो. नागरिकांनी अनोळखी व्यक्ती आढळल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवा. सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा. अफवा पसरवू नका, पण जागरूक रहा, असे आवाहन करण्यात येत आहे.
तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
या मास्क मॅनने चेहरा पूर्णपणे झाकल्यामुळे त्याची ओळख पटवणं अवघड झालं आहे. हातात धारदार शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरताना हा व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीचा हेतू नक्की काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मास्क घालून अशा प्रकारे लोकांच्या मनात दहशत पसरवणं अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या मास्क मॅनला लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात वावरणाऱ्या मास्क मॅनच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.





