विद्यार्थ्यांनी व्यक्त केली ‘स्वतःबद्दल कृतज्ञता’
शिक्षण विश्व: संत साई शाळेत क्रांती दिन सप्ताह साजरा
पिंपरी चिंचवड: संत साई स्कूल, भोसरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांती दिन सप्ताह ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी हा सप्ताह “कृतज्ञता वर्ष”म्हणून साजरा होत असून, समाजासाठी योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींप्रती आदर आणि आभार व्यक्त केले जात आहेत.
पाचव्या दिवशी स्वतःबद्दलचा आदरभाव आणि कृतज्ञता या विषयावर कार्यक्रम झाला. सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि ज्योत प्रज्वलन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर आणि प्रमुख पाहुणे डॉ. अजित जगताप उपस्थित होते.

हेही वाचा : सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, पथनाट्य आणि कविता सादर करून स्वतःच्या शरीर, मन आणि आत्म्याबद्दल कसे कृतज्ञ रहावे, हे दाखवले. यथार्थ तांबडे याने ‘स्वतःसाठी थोडं जगणा रे…’ ही कविता सादर केली, तर अनुष्का शहाणे हिने ‘अगं स्वतःलाच विसरली का? ही कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्याध्यापक ढवळेश्वर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वभाव आणि अभ्यास या तीन गोष्टींचे महत्त्व सांगितले. डॉ. जगताप यांनीही स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मसन्मान यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन मुग्धा लोंढे व प्रगती प्रसाद या विद्यार्थिनींनी केले. आभार प्रदर्शन संस्कृती लांडगे हिने केले. कार्यक्रमाला अनेक पालक, शिक्षक आणि शाळेच्या विश्वस्त यांची उपस्थिती लाभली.
“हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी परिसरात रॅली काढली. त्यांच्या देशभक्तीच्या घोषणा परिसरात घुमल्या. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा समारोप “वंदे मातरम्” गीताने झाला.





